छत्रपती संभाजीनगर शहरातील भिमनगरमध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीने प्रियकराच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. 19 जुलै रोजी तिने राहत्या घरी गळफास घेतला होता. याप्रकरणी तिच्या आईने छावणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. छावणी पोलिसांनी प्रियकर सचिन राजू भिसे (वय 19 वर्षे) राहणार मिल्क कॉर्नर याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे, अशी माहिती सहाय्यक निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली.
advertisement
पैशांअभावी थांबणार नाहीत उपचार, रुग्णांच्या मदतीला जिल्हा मदत कक्ष धावणार, कसा करायचा अर्ज?
नेमकं घडलं काय?
प्रिया (नाव बदलले आहे ) हिने ऑपरेशन टेक्निशियनचा कोर्स केल्यानंतर एका खाजगी रुग्णालयामध्ये ती नोकरी करत होती. त्याच रुग्णालयात सचिन भिसे हा वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता. या ठिकाणी त्या दोघांची जानेवारी 2025 मध्ये मैत्री झाली. त्याच मैत्रीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. काही दिवसांनी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्या दोघांच्या लग्नासाठी प्रियाच्या वडिलांचा विरोध होता आणि त्यानंतर प्रियाच्या वडिलांनी सचिन सोबत सर्व संबंध बंद करण्यासाठी सांगितले. पण त्यानंतरही सचिन प्रिया व तिच्या आईला सतत पैशाची मागणी करत होता.
प्रियाच्या आईने सचिनला दुचाकी घेण्यासाठी 3 हजार रुपयांची मदत देखील केली होती. 19 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता प्रिया तिच्या आईबरोबर बाहेर जाण्यासाठी निघाली होती. मात्र अर्ध्या रस्त्यातूनच त्या दोघीजणी घरी परतल्या. पण त्याच दरम्यान प्रिया सचिन सोबत बोलत होती. खूप वेळ झाला होता आणि प्रिया अजून सुद्धा तिच्या खोली बाहेर आली नव्हती. त्यामुळे तिच्या आईने तिच्या खोलीमध्ये जाऊन बघितलं. तेव्हा त्यांना ती थेट लटकलेल्या अवस्थेत आढळली. तेव्हा याबाबत पोलिसांना कळवण्यात आले.
आरोपी सचिन भिसेला पोलीस कोठडी
सचिन भिसे हा मिल्क कॉर्नर परिसरात भावासोबत राहतो. लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झालेले आहे. त्याने 11 वी पर्यंत शिक्षण घेतले असून त्यानंतर तो वॉर्डबॉय म्हणून रुग्णालयात काम करत आहे. तरुणीने आत्महत्या केल्याप्रकरणी सचिनला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
स्नॅपचॅटमधून धक्कादायक माहिती
प्रिया हिच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर वडिलांनी तिचा मोबाईल तपासला. तेव्हा तिच्या मोबाईलवर सचिनचे पाच-सहा मिस कॉल आढळले आणि त्या दोघांची स्नॅपचॅटवरील चॅट देखील तिच्या आईने वाचली. या चॅटमध्ये प्रिया सचिनला काही गोष्टी कोणाला न सांगण्याची सारखी विनवणी करत होती. ‘सचिन, प्लीज, सांगू नको. प्लीज, सचिन ऐक ना, सचिन प्लीज सांगू नको हे. मी वापस काही नाही बोलणार, परेशान नाही करणार, लास्ट चान्स दे फक्त, प्लीज प्लीज’ असे मेसेज चॅटमध्ये आहेत.
प्रियाच्या आईचा आरोप
सचिन हा प्रियाला ब्लॅकमेल करून पैसे मागत होता. त्यामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केली आहे, असा आरोप तिच्या आईने केला आहे. त्यांच्यातला चॅटिंगचे स्क्रीनशॉट देखील तिच्या आईने पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत.






