शकील आरेफ शेख (वय 30, रा. फुलेनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सय्यद सिराज अली सय्यद नसेर अली ऊर्फ मोठा सिराज याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह छोटा सिराज, जब्बार, कबीर आणि आणखी एक अशा एकूण पाच जणांविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुमच्या मुलांना जपा, छ. संभाजीनगरमधील बेपत्ता मुलगा सापडला, भिकाऱ्यांचं धक्कादायक कनेक्शन समोर
advertisement
पोलिस तपासानुसार, शकीलवर त्याच्या मित्रांनी आधी कारमध्ये चाकूने वार केला. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असतानाही त्याच्यावर उपचाराचा बनाव करत बँडेज लावण्यात आला आणि पुन्हा अमानुष मारहाण करण्यात आली. पायावर सिगारेटचे चटके देत छळ केला गेला. श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी त्याला जटवाडा परिसरात नेऊन गळा तसेच हाताची नस कापून त्याची हत्या केली आणि मृतदेह डोंगरात फेकून दिला.
मृत शकीलचा भाऊ सलमान आरेफ शेख याने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी सिराजने शकीलला धमकी दिली होती. शकील 4 जानेवारीपासून बेपत्ता होता. मात्र, तो पूर्वीही दोन-तीन दिवस घराबाहेर राहत असल्याने कुटुंबीयांनी तात्काळ तक्रार दिली नव्हती.
दरम्यान, बेपत्ता होण्याच्या आठ दिवस आधी आरोपी सय्यद सिराज अली याने शकीलच्या आईला फोन करून मोबाइल आणि पैसे परत न केल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचेही तपासात समोर आले आहे. 4 जानेवारी रोजी शकील सिराजसोबत घरातून बाहेर पडला होता. त्याच रात्री त्याने कुटुंबीयांना फोन करून तो सिराज व इतर मित्रांसोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला.
कुटुंबीयांची चौकशी सुरू असतानाच गुन्हे शाखा व छावणी पोलिसांची तीन पथके सक्रिय झाली. सायंकाळी सिराजचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासात सिराजवर यापूर्वी 2019 मध्ये हत्येचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे ही त्याच्यावर नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या तो जामिनावर बाहेर होता. इतर आरोपीही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सलमान शेख यांच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा अधिक तपास छावणी पोलिसांकडून सुरू आहे.






