काही दिवसांपूर्वी तीन मुली घरातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. पीडित मुलींच्या नातेवाईकांनी पोलीस स्थानकात 8 जून रोजी रात्री तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, त्यांनी 13 आणि 15 वर्षीय मुली 7 जूनपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली. याच दरम्यान आणखी 11 वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार आगशी पोलिसांत करण्यात आली. या तिघी एकत्रितपणे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्याचीही माहिती समोर आली होती.
advertisement
पोलिसांकडून तात्काळ शोध...
तक्रार दाखल झाल्यानंतर प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ एक पथक तयार करून या तीन अल्पवयीन मुलीचा शोध सुरू केला. या दरम्यान, या मुली कळंगुट परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी कळंगुट येथील एका हॉटेलमधून तिन्ही अल्पवयीन मुलींची सुटका केली. त्याच वेळी पोलिसांनी त्याच्या सोबत असलेल्या दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी ते कळंगुटमध्ये गेल्याचे समोर आले. या दरम्यानच त्यातील 15 वर्षीय आणि 11 वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले.
दोघांना अटक...
तपासादरम्यान आरोपी अल्ताफ मुजावर (19 वर्ष) आणि ओम नाईक (21 वर्षे) या दोघांना अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहिता कलम 137(2), 64(1), 74, 75(1), गोवा बाल कायद्याच्या कलम 8(2) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 4, 8, 12 अंतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.
हॉटेल मालकाला अटक
पीडित अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांच्या संमतीशिवाय हॉटेलमध्ये प्रवेश दिल्याच्या आरोपाखाली कळंगुट पोलिसांकडून बागा येथील हॉटेलचे मालक रजत चव्हाण यांना देखील अटक केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आता पोलिसांकडून हॉटेलवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. हॉटेल सील करून त्याचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.