या धक्कादायक प्रकरणातल्या मृत युवकाची पोलिसांनी ओळख पटवली आहे. तो कासगंज इथला रहिवासी आहे. तरुणी आणि तिच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे; मात्र अन्य आरोपींचाही शोध सुरू आहे.
26 फेब्रुवारीला पोलिसांना फरह इथे एका कारमध्ये जळलेला मृतदेह सापडला होता. पोलिसांनी त्या तरुणाची ओळख पटवून मृतदेह पोस्टमॉर्टेमला पाठवला. त्या मृत तरुणाचं नाव पुष्पेंद्र यादव असं होतं. पोलिसांनी या ब्लाइंड मर्डर केसचे धागेदोरे शोधायला सुरुवात केली. त्यासाठी पोलिसांनी एक विशेष टीम स्थापन केली. 72 तासांत त्यांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपी आई-मुलीला अटक केली.
advertisement
पोलिसांनी याविषयी माहिती दिली. त्यानुसार, कारमध्ये मिळालेला मृतदेह कासगंजचा रहिवासी असलेल्या पुष्पेंद्र यादवचा होता. फरहमधल्या अवधेश यादव यांची मुलगी डोली हिच्याशी पुष्पेंद्रचं प्रेमप्रकरण होतं. पाच महिन्यांपूर्वी पुष्पेंद्र तिला पळवून घेऊन गेला होता. त्या प्रकरणी अवधेश यांनी पुष्पेंद्रविरोधात गुन्हा दाखल केला होता. या घटनेमुळे त्यांचं पुष्पेंद्रशी शत्रुत्व निर्माण झालं होतं आणि त्याला धडा शिकवण्याचं त्यांच्या मनात होतं.
25 फेब्रुवारीला अवधेश यांनी या प्रकरणासंदर्भातल्या निर्णयासंबंधी चर्चा करण्यासाठी फोन करून पुष्पेंद्रला घरी बोलावलं. पुष्पेंद्र त्यांच्या घरी गेला, तेव्हा आधीपासूनच तयारीत असलेल्या आरोपींनी त्याची हत्या केली. मृतदेह कारमध्ये ठेवून कार जाळण्यात आली. पोलिसांनी सांगितलं, की पुष्पेंद्रच्या हत्येसाठी अवधेश यांनी आपली पत्नी भूरी यादव, मुलगी डोली आणि भाऊ राजेश यादव यांच्यासह मिळून नियोजन केलं होतं. पोलिसांनी हत्येप्रकरणी आरोपी भूरी यादव आणि त्यांची मुलगी डोली हिला अटक केली आहे. अवधेश आणि राजेश यांचा शोध सुरू आहे.