गेवराई तालुक्यातील गोविंद जगन्नाथ बर्गे हे प्लॉटिंगचे व्यवसाय करत होते. या व्यवसात त्यांचा हळूहळू चांगला जम बसायला लागला होता. त्याच दरम्यान त्यांची ओळख पारगाव कलाकेंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड सोबत झाली होती. त्यानंतर ही ओळख जवळीकमध्ये वाढत गेली आणि या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, प्रेमात पूजाने गोविंदकडून पैशांची मागणी सुरू केली होती. त्यानुसार गोविंदने वेळोवेळी पूजाला व तिच्या नातेवाइकांना पैसे, सोन्याचे दागिने दिले. एवढेच नव्हे, तर तिच्या भावासाठी महागडा मोबाईल व बुलेट मोटारसायकल खरेदी केली. तिच्या आईसाठी सासरच्या गावी घर बांधून दिले, तर मावशीसाठी वैराग येथे प्लॉट घेतला. याशिवाय नातेवाइकांच्या नावावर तीन एकर शेतीही विकत घेतली होती. मात्र, या सर्व गोष्टी असूनही पूजाच्या अपेक्षा वाढतच गेल्या. सततच्या दबावामुळे आणि वाढत्या तणावाखाली अखेर बर्गे यांनी आत्महत्येचे टोक गाठले.
advertisement
गोविंदने पूजाला स्वतःचे कला केंद्र सुरू करण्यासाठी सुमारे 8 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली. त्याशिवाय, तिचे सर्व हट्ट तो पूर्ण करत होते. मात्र तिच्या मागण्या सतत वाढत होत्या. पूजाला वाढदिवसाच्या आधी गेवराईतील घर देखील तिच्या नावावरती करून हवं होतं, अशी माहितीदेखील समोर आली. गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली नसून त्यामागे घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली अन्...
पोलिसांनी बर्गे यांच्या आत्महत्येनंतर नर्तकी पूजा गायकवाडला ताब्यात घेतले. पूजा गायकवाड ही ती सध्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी चौकशीस सुरू केल्यानंतर तिने काही गोष्टींची कबुली दिली आहे. पोलीस चौकशीत तिने गोविंद बर्गे सोबत आपले प्रेम संबंध असल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, बर्गे यांनी पूजाशी बोलणी करण्यासाठी तिच्या गावी भेट दिल्यानंतर स्वतःच्या गाडीसमोर आयुष्य संपवले. मात्र ही घटना आत्महत्या आहे की घातपात, यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. कुटुंबीय आणि मित्रांनी यामागे कट असल्याचा संशय व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.