गुजरात सरकारमधील पंचायत राज्यमंत्री बाछू खाबड यांच्या मोठ्या मुलाला अटक केली. बाछू खाबड यांचा मुलगा बलवंत खाबडने हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला बाथवाडा टोल प्लाझाजवळ ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. मागील काही दिवसांपासून तो फरार होता. अखेर पोलिसांनी बलवंत खाबडच्या मुसक्या आवळल्या आहेत. 71 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
advertisement
प्रकरण काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, दाहोद जिल्ह्यात श्री राज कन्स्ट्रक्शन कंपनीने नियमांचे पालन न करता मनरेगाचे पैसे लाटले होते. एप्रिल महिन्यात प्रशासनाला या घोटाळ्याबाबत मिळाली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीनुसार 32 कंपन्यांनी देवगड बारिया आणि धानपुर भागात सामग्री दिली होती. यापैकी कुठल्याही कंपनीने सर्वात कमी बोली लावली नव्हती आणि ही बाब नियमबाह्य होती. मनरेगाचा कोणताही प्रकल्प सुरू झाला नव्हता. पण, त्याचे पैसे आधीच लाटल्याचा प्रकार समोर आला.
घोटाळ्यातील आरोपी बलवंत आणि त्याचा धाकटा भाऊ किरण यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. परंतु नंतर त्यांनी हे अर्ज मागे घेतले. बलवंत आणि सह-आरोपी दर्शित पटेल यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, विरोधकांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. या मनरेगा घोटाळ्याची व्याप्ती अधिक असण्याची शंका विरोधकांनी उपस्थित केली आहे.