इंदूरमध्ये गाजत असलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आलेल्या राज कुशवाहाच्या समर्थनार्थ त्याची बहीण समोर आली असून, तिने स्पष्टपणे सांगितले आहे की, "माझा भाऊ निर्दोष आहे. तो अशा प्रकारचा गुन्हा करूच शकत नाही."
माध्यमांशी बोलताना राज कुशवाहाच्या बहिणीने अत्यंत भावूक होत आपली बाजू मांडली. ती म्हणाली, "राज आणि विक्की दोघंही माझ्यासाठी भावासारखे आहेत. दोघेही असे काही करू शकत नाहीत. माझा भाऊ कुठेही पळून गेलेला नाही. तो नेहमीसारखा कामाला जात होता. तुम्ही तो काम करत असलेल्या ठिकाणी त्याच्याबाबत विचारणा करू शकता असेही तिने म्हटले.
advertisement
या संपूर्ण प्रकरणात राज कुशवाहाचं नाव येताच कुटुंबीय हादरले आहे. त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून त्याला त्वरीत सोडण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली आहे. "माझी एवढीच मागणी आहे की, माझा भाऊ राज निर्दोष आहे आणि त्याला त्वरित सोडण्यात यावं," असं तिने आर्जव केले.
दरम्यान, पोलिस तपास सुरू असून, प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र आरोपींच्या कुटुंबीयांकडून वेगळीच भूमिका घेतली जात असून, यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होत आहे.