जवळपास दोन आठवड्यांपूर्वी शहरातील जवाहर रोडवरील श्रीराम मंदिराजवळ राहणाऱ्या आपल्या मुलीकडे आलेल्या 73 वर्षीय लीलाबाई रघुनाथ विसपुते यांच्यावर त्यांच्या नातवानेच कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लीलाबाई यांनी तब्बल 12 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर मंगळवारी उपचारादरम्यान पुण्यात प्राण सोडले.
ही धक्कादायक घटना 26 जून रोजी घडली होती. लीलाबाई विसपुते या त्यांच्या मुलीकडे काही दिवस राहण्यासाठी आलेल्या असताना, घरातच त्यांचा नातू तेजस पोद्दार याने कुऱ्हाडीने अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांना प्रथम धरणगाव ग्रामीण रुग्णालयात, नंतर जळगावमधील खासगी रुग्णालयात आणि शेवटी पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
advertisement
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शेअर बाजारात पैसे अडकले असल्याने लीलाबाई विसपुते यांनी तेजसला लोकांकडून पैसे उधार घेऊ नकोस, असे बजावले होते. या कारणावरूनच तेजसने रागाच्या भरात आजवरचं माणूसकीचं नातं विसरून थेट आजीवर कुऱ्हाडीने हल्ला केला.
या घटनेने संपूर्ण धरणगाव हादरून गेले असून, नातवानेच आजीचा जीव घेतल्याने परिसरात चर्चा आणि संतापाचे वातावरण आहे. तेजस पोद्दार याला धरणगाव पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
