जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात एका हॉटेलजवळ गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास एका तरुणाची हत्या झाली. आकाश पंडित भावसार (वय 30) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, पत्नीच्या नातेवाईकांनीच त्याचा खून केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप...
मृत आकाश भावसारच्या पत्नी पूजा हिचे तिच्या सख्या मावस भावासोबत अनैतिक संबंध होते, असा गंभीर आरोप आकाशच्या आई, बहिण व मेव्हणे यांनी केला आहे. याच नात्यातून खुनाचा कट आखण्यात आला, असल्याचा दावा त्यांनी केला.
advertisement
हत्या झाल्यानंतर आकाशच्या कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही आणि कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे ते म्हणाले.
पूजाच्या मावस भावानेच आकाशचा खून केला असून, त्याला शोधून मारण्यासाठी मारेकरी सकाळीच आकाशच्या मूळ गावात गेले होते. मात्र तो जळगावमध्ये असल्याचे समजल्यावर त्यांनी तिथे जाऊन त्याच्यावर हल्ला केला, असल्याचा आरोप आकाशच्या कुटुंबीयांनी केला आहे.
विशेष म्हणजे, आकाशच्या हालचालींबाबत माहिती त्याच्या पत्नी पूजानेच मारेकऱ्यांना दिल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. शहरात आणि कुटुंबीयांत संतापाची लाट उसळली आहे.
