अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील पूनम धर्मराज पाटील (वय 23) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
advertisement
पूनमची आई द्वारकाबाई रामेश्वर जिगे (रा. मठपिंपळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्नात हुंडा दिला नाही म्हणून आणि माहेरून पैसे आणण्यासाठी पूनमचा सतत मानसिक छळ केला जात होता. तिला वारंवार मारहाण करून उपाशीपोटी ठेवले जात असे. या छळाला कंटाळूनच तिने टोकाचे पाऊल उचलले.
याप्रकरणी पती धर्मराज विष्णू पाटील, सासरा विष्णू पाटील, सासू लक्ष्मी पाटील, पंढरीनाथ पाटील, रेणुका पाटील, सारिका व तिचा पती यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ, पोलिस निरीक्षक संतोष घोडके, आणि सहायक पोलिस निरीक्षक भगवान नरवडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक छोटुराम ठुबे करीत आहेत.






