हरियाणामधून हेरगिरीच्या आरोपाखाली पकडलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा गेल्या वर्षी 2024 मध्ये 2 महिन्यांच्या आत पाकिस्तान आणि नंतर चीनच्या भेटीवर गेली होती. या दोन्ही देशांच्या पर्यटनाचा व्लॉग तिने आपल्या युट्युब चॅनलवर पोस्ट केला आहे. पाकिस्तान आणि त्या पाठोपाठ तिने चीनलाही भेट दिल्याने तपास यंत्रणांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. ज्योती ही 17 एप्रिल 2024 रोजी एका महिन्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. ती पाकिस्तानमध्ये 15 मे पर्यंतच राहिली होती.
advertisement
पाकिस्ताननंतर चीनचा दौरा...
पाकिस्ताननंतर ज्योती भारतात परतली आणि सुमारे 25 दिवसांनी 10 जून रोजी ती चीनला गेली. त्यानंतर 9 जुलै रोजी तिथे होती. यानंतर, तेथून ती 10 जुलै रोजी नेपाळमधील काठमांडू येथे पोहोचली. ज्योती ही 30 मार्च रोजी नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात पाकिस्तान राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात पाहुणी म्हणून गेली होती. यावेळी तिचे स्वागत पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिशने केले होते. दानिशला ऑपरेशन सिंदूर नंतर पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले होते.
ज्योतीने करतारपूर कॉरिडॉरमार्गे पाकिस्तानमध्ये दाखल झाली होती. त्यावेळी तिने पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज शरीफ यांची भेट घेतली आणि त्यांची मुलाखतही घेतली.
ज्योती भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आली...
ज्योतीच्या व्लॉगने तिच्यावरील संशय वाढवला. तपास यंत्रणांना काही गोष्टीवर संशय आला आणि ज्योती रडारवर आली. पाकिस्तान आणि चीनमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असले तरी ज्योतीला दोन्ही देशांचे व्हिसा एकाच वेळी कसे मिळाले? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला. त्याशिवाय, ज्योती ही कोणतीही नोकरी करत नाही. फक्त व्हिडीओ व्लॉगद्वारे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे. हिसारमध्ये तिचे घर आहे. मग, पाकिस्तान आणि चीनच्या दौऱ्याचा खर्च कोणी केला हा प्रश्नही उपस्थित झाला. त्याशिवाय ती पाकिस्तानी दूतावासाच्या पार्टीत पाहुणी कशी बनली? दानिशसोबत तिचे इतके मैत्रीपूर्ण संबंध कसे काय आणि एका साध्या ट्रॅव्हलरला पाकिस्तानच्या पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम शरीफ मुलाखत कशी देतात, तिला ही भेट कोणी घालून दिली, आदी प्रश्न उपस्थित झाले.
याशिवाय ज्योती ही चीन, पाकिस्तान, इंडोनेशिया आदी परदेशी ठिकाणी फिरली. या दौऱ्यात ती विमानातील फर्स्ट क्लासचा प्रवास, महागड्या हॉटेल मध्ये वास्तव्य करायची. हा खर्च देखील संशयाच्या भोवऱ्यात आला.
पाकिस्तानमध्ये आवडेल तिथे प्रवास...
भारतीय पर्यटक पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर पाकिस्तानी पोलिसांची नजर असते. व्हिसामध्ये नमूद असलेल्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला जातो, त्या शहरांमध्ये फिरू शकतात. मात्र, ज्योती पाकिस्तानमध्ये होणाऱ्या हाय-प्रोफाइल पार्ट्यांमध्येही सहभागी व्हायची. या ठिकाणी ती पाकच्या गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांना ती भेटली. त्याशिवाय, पाकिस्तान दूतावासातील इफ्तार पार्टीत दानिशसोबतचे तिचे संभाषण अतिशय मैत्रीपूर्ण वाटले. यातच ज्योती फसली असल्याचे सूत्रांनी सांगितले.