पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यामध्ये एका गेस्ट हाउसमध्ये विचित्र प्रकार घडला. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातला संतोषपूरचा रहिवासी असलेल्या एका व्यक्तीनं प्रेयसीला गोळी मारून स्वतः आत्महत्या केली. राजेश कुमार साहू असं त्याचं नाव आहे. बुधवारी (3 जुलै) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला. परिस्थितीजन्य पुराव्यांवरून त्या दोघांचं प्रेमप्रकरण सुरू असल्याचं लक्षात येतं; मात्र काही कारणांवरून त्यांच्याच वाद होत होता, असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
advertisement
ते दोघं एका गेस्ट हाउसमध्ये थांबले होते. तिथे त्या मुलीच्या पायात गोळी लागली. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत; मात्र तिची प्रकृती गंभीर आहे. आरोपी राजेश साहू याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी नऊ एमएमची बंदूक जप्त केली.
फेब्रुवारीतही घडली अशीच घटना
याच प्रकारची आणखी एक घटना फेब्रुवारीमध्ये घडली होती. हुगळीमध्ये एका प्रियकराने प्रेयसीचं डोकं ठेचून हत्या केली होती. त्यानंतर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सैकत सरकार असं आरोपीचं नाव होतं. त्या दोघांचं बऱ्याच काळापासून प्रेमप्रकरण सुरू होतं; मात्र घटनेच्या थोडे दिवस आधी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. ते दोघंही हुगळीच्या पांडुआ भागात राहायचे. आरोपी प्रियकर प्रेयसीच्या घरी नेहमी जायचा. त्या दोघांच्या सामाजिक स्तरातला फरक हे नातं तुटण्यामागचं कारण होतं. प्रेयसीची आई हायस्कूलमध्ये शिक्षिका होती, तर प्रियकर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. याच कारणावरून आई-वडिलांच्या दबावामुळे मुलीनं प्रियकराबरोबरचं नातं तोडलं होतं.
वाचा - महिलेला रिक्षात ओढून नेत सामूहिक अत्याचार; तब्बल 22 वर्षानंतर तो जेरबंद
गेल्या वर्षीही घडला प्रकार
नादिया जिल्ह्यात 2023 साली असाच एक प्रकार घडला होता. वीस वर्षांच्या प्रेयसीनं 44 वर्षांच्या प्रियकरावर गोळी झाडून त्याची हत्या केली होती. प्रियकराचं लग्न झालं होतं व त्याला चार मुलंही होती. आरोपी महिलेला ते नातं संपवायचं होतं; मात्र झारखंडमधल्या जमशेदपूर इथं राहणाऱ्या प्रियकराला ते मान्य नव्हतं. त्यामुळे तिने त्याला मारलं. मदनपूर रेल्वे स्थानकाजवळ तो प्रेयसीला भेटायला आला होता. तेव्हा त्यांच्यात भांडण झालं व तिनं त्याच्यावर गोळी झाडली. त्यानंतर ती दुचाकीवर बसून फरार झाली. नंतर पोलिसांनी तिला अटकही केली. रौतारी गावच्या जात्रापूरची ती रहिवासी होती. पोलीस चौकशीत तिनं गुन्हा कबूल केला.
पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या या विविध घटनांमध्ये प्रेमप्रकरण हाच सामायिक धागा दिसून आला आहे.
