राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे अशा घटनांना कारणीभूत असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. आता, नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. बलात्कार पीडित मुलगी ही 12 वर्षांची आहे. घणसोली रेल्वे स्थानकात ही मुलगी अस्वस्थ अवस्थेत बसल्याचं पोलिसांना आढळून आलं होतं.
advertisement
अस्वस्थ दिसणारी मुलगी गस्ती पथकाला दिसली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी या मुलीची अधिक चौकशी केली. त्यावेळी ती अनाथ असल्याचं आढळून आले. पोलिसांनी पीडितेसोबत संवाद साधत तिला विश्वासात घेतले. या दरम्यान तिच्यासोबत वाईट कृत्य झाल्याची भीती त्यांच्या मनात आली. त्यानंतर त्यांनी या अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली. या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे निष्पन्न झाले. या पीडितेवर शहरी भागात अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिला रेल्वे स्थानक परिसरात नराधमांनी सोडले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वाशी रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पीडित अल्पवयीन ही अनाथ असल्याने तिला सध्या आश्रमशाळेत ठेवण्यात आले आहे.
नाशिकमध्ये 20 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार
नाशिकच्या पंचवटी भागात एका २० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघकीस आली आहे. आरोपींनी पीडित महिलेला शेतात घेऊन जात अत्याचार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेनं आरोपींचा विरोध केला असता तिला शेतात मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सामूहिक अत्याचारासह मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर दुसरा आरोपी फरार आहे. पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेचा सविस्तर तपास पंचवटी पोलीस करत आहेत.
