नालासोपारा पूर्वेच्या श्रीराम नगर येथे राहणारे मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान (वय 33) यांना दोन मुली आहेत. त्यांची धाकटी मुलगी शिद्रा खातून ही 6 वर्षांची होती. शनिवारी दुपारी त्यांनी तिला शाळेतून घरी आणले होते. संध्याकाळी ती घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र ती कुठेच आढळली नाही. अखेर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका कॅमेऱ्यात खान यांचा 13 वर्षीय भाचा शिद्राखातून हिला घेऊन जाताना दिसला. त्याला याबाबत विचारले असता त्याने दोन अज्ञात व्यक्तींनी शिद्राखातूनची हत्या केल्याची खोटी माहिती त्याने दिली. त्यानंतर दु:ख आवेगात असलेले कुटुंबीय रात्री 11.30 वाजता पेल्हार पोलीस ठाण्यात पोहोचले.
advertisement
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी रात्रीच्या वेळी डोंगर परिसरात शोधमोहीम सुरू केली. त्यांना शिद्राखातूनचा मृतदेह आढळला. तपासादरम्यान पोलिसांनी संशयित 13 वर्षीय मुलाची कसून चौकशी केली. त्याच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या. पोलिसांच्या चौकशीत अखेर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
कारण ऐकून सगळेच हादरलं
संपूर्ण कुटुंब शिद्राखातूनवर विशेष प्रेम करत होते. तिच्यावर होणारा लाड बघवत नसल्याने आरोपी भावाने तीचा डोंगरात नेऊन गळा दाबला आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा जीव घेतला असल्याची कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. सोमवारी त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे.
