पुणे: इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. लाखेवाडी येथील शेतकरी राहुल बरकडे यांना खासगी सावकाराकडून अतिरिक्त व्याजाचे पैसे देण्यास तगादा लावण्यात आला होता. राहुल यांनी मूळ रकमेच्या दुप्पट पैसे परत केले तरीही आरोपींनी अधिक रक्कम मागण्याचा तगादा सुरू ठेवला. आरोपींकडून त्यांना जीव घेण्याची धमकी देखील देण्यात आली होती. तसेच, त्यांना विषप्राशन करण्यास प्रवृत्त करण्यात आले.
advertisement
राहुल बरकडे यांनी 2024 साली विहीर खोदण्याच्या कामासाठी सराटी येथील ओंकार किसन गिरी आणि अभिजीत किसन गिरी यांच्याकडून 90 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या रकमेवर 10 टक्के दराने व्याज ठरवण्यात आले होते. कर्ज घेतल्यानंतर राहुल यांनी वेळोवेळी पैसे परत करत आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपये दिले होते. मात्र, एवढी रक्कम परत करूनही आरोपींकडून पुन्हा 90 हजार रुपयांची मागणी करण्यात येत होती. या मागणीसाठी आरोपी वारंवार राहुल यांना मानसिक त्रास देण्यात येत होता.
3 जानेवारीला लाखेवाडी परिसरात मंदिरात जायचे आहे असे सांगून आरोपींनी राहुल यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले. मात्र गाडी बावड्याच्या दिशेने वळवून गाडीतच त्यांना मारहाण आणि चाकूचा धाक दाखवण्यात आला. पुढे सराटी येथील पुलाखाली नेऊन त्यांना विवस्त्र करत अपमान करण्यात आला. आमच्या गोठ्यावर काम करून पैसे फेडण्याची नोटरी करून दे, अशी मागणी करत आरोपींनी त्यांना अकलूजपर्यंत नेले. त्यानंतर आरोपी तुषार कोकाटे याने राहुल यांना बावडा येथील पेट्रोल पंपावर उतरवून औषध पिऊन मर, असा अमानवीय सल्ला दिला.
या मानसिक तणावाखाली राहुल यांनी कृषी केंद्रातून कीटकनाशक आणले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर आरोपींनीही त्यांना औषध पिण्यासाठी प्रवृत्त केले. राहुल यांनी कीटकनाशक सेवन केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर राहुल यांनी मित्र अमोल घाडगे यांच्याशी संपर्क साधला. अमोल यांनी तत्काळ मदत करत राहुल यांना बावडा येथील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे सध्या राहुल यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात अभिजीत गिरी, ओंकार गिरी, तुषार कोकाटेसह आणखी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
