मारेकऱ्याने धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला केला आहे. ड्युटीवर जाताना आरोपीनं आधी संबंधित व्यक्तींचा रस्ता अडवला. त्यांच्यावर दमदाटी करत हल्ला केला. याबाबतचा एक सीसीटीव्ही धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक हल्लेखोर एका साई संस्थानच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करत असल्याचं दिसून येत आहे. संबंधित कर्मचारी पहाटे आपल्या दुचाकीने कामावर जात होते. यावेळी हल्लेखोराने सर्वप्रथम त्यांची गाडी अडवली. यानंतर कर्मचारी गाडी घटनास्थळी ठेवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोराने त्यांना गाठलं. त्याने एका हातात धारदार शस्त्र आणि दुसऱ्या हाताने कर्मचाऱ्याची कॉलर पकडली.
advertisement
यानंतर आरोपीनं कर्मचाऱ्याच्या पोटात आणि छातीत सपासप वार करायला सुरुवात केली. हा हल्ला झाल्यानंतर कर्मचाऱ्याने कशीबशी हल्लेखोराच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोराने पुन्हा त्यांना पकडून त्यांच्यावर सपासप वार केले. एवढे वार झाल्यानंतर देखील संबंधित कर्मचाऱ्याने रक्तबंबाळ अवस्थेत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोराने त्यांचा पाठलाग करून त्यांचा जीव घेतला. याबाबतचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कुष्णा शेजुळ असं हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत. दोघंही साई संस्थानचे कर्मचारी आहेत. सुभाष घोडे यांच्यावर कर्डोबा नगर चौकात हल्ला करण्यात आला. तर नितीन शेजुळ यांच्यावर साकुरी शिव परिसरात हल्ला झाला आहे. या दोघांवर झालेला हल्ला इतका भयंकर होता की, दोघांचाही मृत्यू झाला आहे. हल्ला झालेल्या तिसऱ्या तरुणाचं नाव कृष्णआ देहरकर असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या ठिकाणी अशाप्रकारे हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाल्या, तिघांना अशाप्रकारे का टार्गेट करण्यात आलं? याबाबत काहीच माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाची चक्र फिरवली आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. लवकरच आरोपींना अटक केलं जाईल, असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलंय.