झोल करण्यासाठी आरोपींची कंपनी...
फ्लिपकार्टकडून नष्ट करण्यासाठी दिलेलं खाद्य आणि इतर जीवनावश्यक साहित्य बेकायदेशीररीत्या बाजारात विक्रीसाठी पाठवल्याचा मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, हे दोघंही ‘इको स्टार रिसायकलिंग अँड ई-वेस्ट रिसायकलिंग’ कंपनीचे संचालक असल्याची माहिती समोर आली आहे.
या दोघांनी शिळ परिसरातील दहिसर नाका येथील आरिफ कंपाऊंडमधील गोदाम क्रमांक 6 भाड्याने घेतलं होतं. फ्लिपकार्ट कंपनीने कालबाह्य झालेलं साहित्य नष्ट करण्यासाठी या कंपनीला जबाबदारी दिली होती. मात्र, हे साहित्य नष्ट करण्याऐवजी इतर कंपनीच्या नावाने बाजारात विकण्याचा प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक तपशील ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट 1 च्या तपासात उघड झाला.
advertisement
पोलिसांची कारवाई आणि मोठा साठा जप्त
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोदामावर छापा टाकत मोठा साठा उघडकीस आणला. त्या वेळी गोदामात फ्लिपकार्टकडून नष्ट करण्यासाठी पाठवलेलं अन्नधान्य, डाळी, पीठ, साखर, तांदूळ, सुका मेवा, सॅनेटरी नॅपकिन्स, धुलाई पावडर, साबण यांसारख्या वस्तू मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या.
या सर्व वस्तूंवरील मूळ कंपनीचे लेबले हटवून, त्या साध्या प्लास्टिक पिशव्या आणि गोण्यांमध्ये भरल्या जात होत्या. सुमारे 12 टन वजनाचं आणि सुमारे 30 लाख रुपयांच्या किंमतीचं हे साहित्य बाजारात विक्रीसाठी साठवण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे.