डिज्नीलँडच्या सहलीनंतर मुलाची निर्घृण हत्या
2018 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर सरिता रामाराजू कॅलिफोर्नियाच्या बाहेर राहू लागली होती. ती सांता एना येथील एका मोटेलमध्ये आपल्या मुलासह राहत होती. तिने आपल्या मुलासह डिज्नीलँडमध्ये तीन दिवस सहलीसाठी पास खरेदी केला होता. 19 मार्च रोजी तिला मोटेलमधून चेक-आउट करून मुलाला वडिलांकडे सुपूर्द करायचे होते. मात्र त्या दिवशी सकाळी 9.12 वाजता तिने 911 वर कॉल करून सांगितले की, तिने आपल्या मुलाची हत्या केली असून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तिने विषारी औषधं सेवन केल्याचे सांगितले.
advertisement
डिस्ट्रिक्ट अटॉर्नींची प्रतिक्रिया
ऑरेंज काउंटीचे डिस्ट्रिक्ट अटॉर्नी टॉड स्पिट्झर म्हणाले की, एका बालकाचे जीवन त्याच्या आई-वडिलांमधील संघर्षाचा बळी ठरू नये. पालकांमधील संताप आणि वैमनस्य त्यांच्या मुलांवरील प्रेमापेक्षा मोठे होऊ नये. क्रोधामुळे माणूस विसरतो की त्याला कोणावर प्रेम आहे आणि तो कोणासाठी जबाबदार आहे. एका मुलासाठी त्याच्या पालकांची मिठी ही सर्वात सुरक्षित जागा असते. मात्र आपल्या मुलाला प्रेमाने गोंजारण्याऐवजी, सरिता रामाराजूने गळा चिरून त्याचे आयुष्य संपवले.
पालकत्व हक्कांवरून सुरू होता संघर्ष
सरिता रामाराजू आणि तिचा माजी पती प्रकाश राजू यांच्यात मुलाच्या पालकत्वावरून गेल्या वर्षभरापासून न्यायालयीन लढा सुरू होता. सरिताने प्रकाशवर आरोप केला होता की, तो नशेच्या आहारी गेला आहे आणि तिच्याशी सल्लामसलत न करता मुलाच्या आरोग्य व शिक्षणाशी संबंधित निर्णय घेत आहे. या वादामुळे दोघांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता आणि त्याचा शेवट या हत्याकांडाने झाला.
या घटनेमुळे संपूर्ण अमेरिकेत संतापाची लाट उसळली आहे. पालकत्वाच्या वादातून मुलांचे आयुष्य धोक्यात येऊ नये, यासाठी कठोर कायद्यांची गरज असल्याची मागणी केली जात आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सरिता रामाराजूवर खटला दाखल करण्यात आला आहे.
