ही घटना कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात घडली असून मयत तरुणाचं नाव कार्तिक आहे. तो अवघ्या २१ वर्षांचा होता. त्याने मित्रांसोबत १०,००० रुपयांची पैज लावत पाच बाटल्या दारू प्यायली होती. पण मोठ्या प्रमाणात मद्याचं सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेच्या दिवशी कार्तिकने त्याचे मित्र वेंकट रेड्डी, सुब्रमण्यम आणि इतर तिघांना सांगितले होते की, तो एका बैठकीत पाणी न मिसळता पाच बाटल्या दारू पिऊ शकतो.
advertisement
यानंतर वेंकट रेड्डीने मित्र कार्तिकसोबत पैज लावली होती. कार्तिकने पाच बॉटल कोरी दारु प्यायली तर तो कार्तिकला १० हजार रुपये देणार होता. यानंतर कार्तिकने पैज जिंकण्यासाठी पाच बाटल्या रिकाम्या केल्या. पण मद्याचं अतिसेवन केल्याने त्यांची प्रकृती ढासळली आणि तो गंभीर आजारी पडला. या प्रकारानंतर त्याला कोलार जिल्ह्यातील मुलबागल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे मयत कार्तिकचे वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं. त्याच्या पत्नीने आठ दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिला होता. मूल झाल्यानंतर आठव्याच दिवशी कार्तिकचा दारुच्या अतिसेवनाने मृत्यू झाला. याप्रकरणी व्यंकट रेड्डी आणि सुब्रमण्य यांच्यासह सहा जणांविरुद्ध नांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.