संकर्षण कऱ्हाडेचे महाराष्ट्रातील घराघरात चाहते आहेत. रंगभूमी, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून संकर्षण सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहत्यांसोबत जोडलेला असतो. संकर्षणच्या विविध विषयांवरील पोस्ट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. आता संकर्षणने जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय की, 'बाबा महाराज सातारकर फार वाटायचं कधीतरी तुमच्या समोर बसुन , प्रत्यक्ष तुम्हाला पहात , तुमचा अभंग , किर्तन , प्रवचन ऐकावं.. आता ती संधी नाही…. गळा भरून भरून आलाय .. ''
advertisement
पुढे तो म्हणाला की, 'माझ्या लहानपणी बाबांनी नवीन कॅसेट प्लेअर आणला होता.. त्यावर लावलेली पहिली कॅसेट बाबा महाराजांची “आम्ही दैवाचे दैवाचे”. ती ऐकतांना पहिल्यांदा मला “तुकोब्बा , नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि “रूक्मीणी पांडूरंग” ह्यांची बाबा महाराजांच्या गोड आवाजांत “दास पंढरी रायांचे” हे ऐकत ओळख झाली ..'
''आजी आजोबांनी अनेक वर्षं वारी केली.. चातुर्मासात चारही महिने पंढरपूरी मुक्कामी असायचे.. आल्यावर आजी म्हणायची; “काय सांगू तुम्हाला पोरांनो ; बाबा महाराज प्रवचनात बोलतांना त्यांच्या तोंडातून शब्दं मोत्यांसारखे बाहेर पडतात आणि डोळ्यांत माणिक चमकतांत “ .. हे वर्णन ऐकून त्यांचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. तोच चेहरा डोळ्यासमोर आणुन रोज सकाळी त्यांच्या आवाजांत हरिपाठातल्या “बहुत् सुकृताची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी” हे ऐकतांना कित्ती गोड वाटतं काय सांगू ..? प्रवचन करतांना एखाद्या वाक्यानंतर, “काय ….?” किंवा किर्तनात अभंग गातांना लय वाढवण्यासाठी केलेलं “हं हं हं हं” हे आपल्याला प्रत्येक क्षणाला गुंतवून ठेवतं , ठेवत राहील !! मला आजवर वारीला जाण्याचं भाग्यं नाही लाभलं पण , बाबा महाराजांनी मला आणि माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्या आवाजानी , स्वरांनी, श्रवणाने वारकरी केलंय .. आज ते आपल्यातनं गेले पण मी तरी ह्या जगांत आहे तोवर रोजची सकाळ त्यांच्या आवाजातल्या हरिपाठानेच सुरू करीन ! आज बाबा महाराजांना भेटून साक्षात परमेश्वर पण त्यांच्याच आवाजांत ऐकुन पाठ केलेला अभंग म्हणत असेल ; ..“धन्य आजी दिन संत दर्शनाचा , अनंता जन्मीचा शीण गेला” अशा भावना संकर्षणने व्यक्त केल्या आहेत.
संकर्षणच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर त्याच्या 'नियम व अटी लागू' या नाटकाचे जोरदार प्रयोग चालू आहेत. नुकतंच तो 'तीन अडकून सीताराम' या चित्रपटात झळकला होता. त्याला आता पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.