Bhushan Pradhan : अभिनेता भूषण प्रधानने आयुष्यातील एका घटनेनंतर कधीच सिगारेट ओढली नाही. नुकतंच एका मुलाखतीत भूषण प्रधानने आयुष्यातील सिगारेट सोडण्यामागचा गंमतीशीर किस्सा शेअर केला आहे. भूषण प्रधान हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मालिका, चित्रपट आणि ओटीटी विश्वात त्याने आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. आजवर दोन चित्रपटांत भूषण प्रधान स्मोकिंग करताना दिसून आला आहे. पण त्याव्यतिरिक्त त्याने कधीही सिगारेट ओढली नाही. शक्य तितक्यावेळी तो सिगारेटपासून दूर राहतो.
advertisement
भूषण प्रधानचा सिगारेटला रामराम
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत भूषण प्रधान म्हणाला,"ग्रॅज्युएशनला असताना मी पुरुषोत्तम करंडकमध्ये भाग घेतला होता आणि आमची तालीम सुरू होती. तालमीला मी स्वत: जायचो पण तालीम संपल्यावर माझे बाबा मला पिकअप करायला यायचे. असचं एकेदिवशी मी बाबांना सांगितलं होतं की सहा वाजता मला पिकअप करायला या. आमची तालिम त्यादिवशी जरा लवकर संपली. माझे बाबा वेळेच्या बाबतीत शिस्त पाळतात. त्यामुळे सहा ऐवजी पावने सहालाच येऊन थांबले होते. बाबा आता सिगारेट ओढत नाहीत. आधी ओढत होते. पण मी दुसरीत असताना त्यांनी सिगारेट सोडली होती. आजोबांच्या निधनानंतर त्यांनी त्यांची ही वाईट सवय सोडली होती".
भूषण प्रधान म्हणाला," माझी तामिल संपली. तालिम संपवून मी माझ्या मित्रांसोबत बाहेर आलो. बाहेर येऊन बघतो तर बाबा माझ्यासाठी थांबले होते. पण ते एका टपरीच्या जवळ होते. स्कूटरवर बसले होते आणि त्यांच्या हाहात नुकतीच पेटवलेली एक सिगारेट होती. बाबांनी मला पाहिलं मी बाबांना पाहिलं. मी त्यांच्याकडे बघून हात दाखवला आणि त्यांनी नुकतीच पेटवलेली हातातली सिगारेट पटकन फेकून दिली आणि उभे राहिले. ते पाहून माझे मित्र चाट पडले. ते म्हणाले आमच्याघरी उलटं असतं. आम्हाला आमचे बाबा असे पकडतात आणि आम्ही सिगारेट असं टाकून देतो. बाबांना घाबरलेलो असतो. बाबांना पाहून सिगारेट टाकून देतो. इकडे तर उलटं चित्र आहे. पण तेव्हा माझे बाबा मला घाबरलेले नव्हते. बाप बाप होता है. ते मला नक्कीच घाबरलेले नव्हते. त्यांची भीती एवढी नक्की असणार की त्यांच्या हातातील पेटवलेली सिगारेट बघून कदाचित मलासुद्धा ती पेटवण्याची इच्छा होईल. मलादेखील सिगारेटची सवय लागेल".
भूषण पुढे म्हणाला,"मला सवय लागू नये म्हणून बाबांनी त्यांची सिगारेट कायमची टाकून दिली. त्यानंतर त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांच्या हातात मी कधीही सिगारेट पाहिलेली नाही आणि त्यांनी सु्द्धा माझ्या हातात कधी सिगारेट पाहिलेली नाही. फक्त दोन चित्रपटांच्या शूटिंगसाठी मी सिगारेट स्मोकिंग सीन दिले आहेत. पण हे सीन झाल्यानंतरही कधीच ती सिगारेट ओढाविशी वाटली नाही. त्याची सवय लागली नाही. याचं कारण म्हणजे बाबांनी टाकून दिलेली ती सिगारेट आणि त्यानंतरचे माझे बाबा मला कायम डोळ्यासमोर दिसतात".
