नेमके काय घडले?
हैदराबादमध्ये झालेल्या या भव्य सोहळ्यात महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा यांनी 'वाराणसी' चित्रपटाचे टायटल आणि पहिली झलक जगासमोर आणली. याचवेळी तांत्रिक अडचणींमुळे व्हिडिओ दाखवण्यास उशीर झाला, ज्यामुळे राजामौली अत्यंत निराश झाले.
तांत्रिक बिघाडाच्या गोंधळानंतर राजामौली यांनी आपले मन मोकळे करताना म्हटले, "माझा देवावर फारसा विश्वास नाही. हा माझ्यासाठी एक भावनिक क्षण आहे. माझे वडील आले आणि म्हणाले की हनुमान माझ्यासाठी सर्व गोष्टी सांभाळून घेतील. पण ही गडबड झाल्यावर मला त्यांच्यावर राग आला. मी त्यांना म्हणालो, 'हनुमान अशा पद्धतीने मार्गदर्शन करतात का?'"
advertisement
ते पुढे म्हणाले, "माझी पत्नी हनुमानाची खूप मोठी भक्त आहे. ती त्यांच्याशी आपल्या मित्राशी बोलल्यासारखी बोलते. तांत्रिक बिघाड झाल्यावर मी तिच्यावरही राग व्यक्त केला आणि विचारले, 'हनुमान असे वागतात का?'"
राजामौली विरोधात वानर सेना आक्रमक
राजामौलींनी व्यक्त केलेल्या या भावनांमुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त झाला. राजामौलींच्या या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत 'राष्ट्रीय वानर सेना' या संघटनेच्या सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अधिकृत पोलीस तक्रार दाखल केली आहे. नेटिझन्सनी राजामौलींवर टीका करताना म्हटले, "तुम्ही नास्तिक असाल, पण आपल्या अपयशासाठी हनुमानाला दोष देणे अत्यंत लज्जास्पद आहे." तर एका युजरने, "तुम्ही रामायणावर आधारित चित्रपट बनवता, पण हनुमानाबद्दल असे बोलणे चुकीचे आहे. लोकांनीच तुम्हाला राजामौली बनवले आहे, त्यांच्या भावनांशी खेळू नका," असे सुनावले.
या कार्यक्रमात महेश बाबू, प्रियंका चोप्रा, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन यांसारख्या कलाकारांची मांदियाळी होती. आता या एफआयआरमुळे राजामौली आणि 'वाराणसी' चित्रपटाचे निर्माते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
