रितेशने आपल्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितलं की, तो मूळ अभिनेता नाही तर एक आर्किटेक्ट आहे. त्याने आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलं, स्वतःचं प्रोफेशनल ऑफिस सुरू केलं आणि तो कामात व्यग्रही झाला होता. नकाशे काढणं आणि वास्तूंचे आराखडे तयार करणं हेच त्याचं जग होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.
रितेशच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट
advertisement
रितेश म्हणतो, "प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतो, जो तुमच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलून टाकतो. माझ्या आयुष्यात तो क्षण तेव्हा आला, जेव्हा मला एका हिंदी चित्रपटात काम करण्याची अनपेक्षित संधी मिळाली. ते नशिबाचं दार होतं, आणि मी ते उघडण्याचा निर्णय घेतला. तिथून जे सुरू झालं, ते आज तुमच्या समोर आहे."
रितेशने २००३ मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. याच चित्रपटाच्या सेटवर त्याला त्याची 'लाईफ पार्टनर' जिनिलीया भेटली. सुरुवातीला शांत वाटणाऱ्या रितेशच्या करिअरला २००४ च्या 'मस्ती' चित्रपटाने मोठी गती दिली आणि तो प्रेक्षकांचा लाडका झाला. मराठीत 'लय भारी'तून त्याने जी एन्ट्री केली, त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
आता पुन्हा एकदा भाऊचा धक्का
गेल्या वर्षी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात रितेशने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली आणि प्रेक्षकांनी त्याला अक्षरश: डोक्यावर घेतलं. आता ११ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या सहाव्या पर्वात रितेश पुन्हा एकदा होस्ट म्हणून आपल्या भेटीला येत आहे. आता या नवीन पर्वात रितेश कोणत्या नवीन स्टाइलमध्ये स्पर्धकांची शाळा घेणार, हे पाहण्यासाठी अवघा महाराष्ट्र उत्सुक आहे.
