प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते अशोक पंडित यांनी व्हिडीओ शेअर करत सतीश शाह यांच्या निधनाची माहिती दिली. ते म्हणाले, "एक दु:खद बातमी तुम्हाला सांगतोय, आमचे मित्र सतीश शाह यांचं निधन झालं. किडनी फेल झाल्यामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना शिवाजी पार्क येथील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांचं निधन झालं. त्यांचं पार्थिव त्यांच्या कलानगर, वांद्रे येथील घरी आणण्यात येईल."
advertisement
ते पुढे म्हणाले, "आपल्या इंडस्ट्रीचं मोठं नुकसान आहे. सतीशसोबत मी खूप काम केलं. खूप चांगला माणूस, खूप कमालीचा माणूस. पीयूष पांडेची अंतिमयात्रा करून घरी परतत होतो तेव्हा कुटुंबियांनी मला ही बातमी सांगितली. दु:ख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत."
'जिवलग मित्र गमावला'- जॉनी लिव्हर भावुक
साराभाई वर्सेस साराभाई या लोकप्रिय मालिकेत त्यांनी साकारलेली इंद्रवदन साराभाई उर्फ इंदु या भुमिकेनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सतीश शाह यांच्या निधनाची बातमीनं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेते जॉनी लिव्हर यांनी पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं. त्यांनी लिहिलंय, "अत्यंत दुःखानं सांगावं लागत आहे की, आपण एक महान कलाकार आणि माझा 40 वर्षांपासूनचा जिवलग मित्र गमावला आहे. विश्वास बसत नाहीये. कारण दोन दिवसांपूर्वीच मी त्याच्याशी बोललो होतो. सतीश भैय्या, तुमची खूप आठवण येईल. चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील तुमचं अमूल्य योगदान कधीही विसरलं जाणार नाही."
सतीश शाह यांचा जन्म 25 जून 1951 साली मुंबईत झाला. ते एका गुजराती कुटुंबातील होते. मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर FTIIमधून त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं. 1970 साली त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. ये जो हैं जिंदगी ही त्यांची पहिली मालिका होती. त्यानंतर त्यांनी मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, कल हो ना हो, ओम शांति ओम, सत्यमेव जयते सारख्या हिट फिल्म करत बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.
