इंस्टाग्रामवरून झाली ओळख
'पीटीआय' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'स्त्री २' आणि 'भेडीया' सारख्या चित्रपटांना हिट गाणी देणाऱ्या सचिन संघवी यांना गुरुवारी २३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वीस वर्षांच्या आसपास आहे. तिने दावा केला आहे की, फेब्रुवारी २०२४ मध्ये तिची सचिन संघवी यांच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. सचिन यांनी तिला त्यांच्या संगीत अल्बममध्ये काम करण्याची संधी देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यानंतर दोघांनी फोन नंबरची देवाणघेवाण केली.
advertisement
स्टुडिओत बोलावून अत्याचार
तक्रारदार महिलेने आरोप केला आहे की, सचिन संघवी यांनी तिला त्यांच्या स्टुडिओत बोलावले. तिथे त्यांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यानंतर अनेकवेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या गंभीर आरोपांची चौकशी केल्यानंतर सचिन संघवी यांना अटक करण्यात आली आहे.
'सचिन-जिगर' जोडीचे हिट संगीत
सचिन संघवी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर यांचा भाग आहेत. सचिन-जिगर या जोडीने अनेक चार्टबस्टर गाणी दिली आहेत. त्यांच्या काही गाण्यांमध्ये 'जीने लगा हूँ' (रमैया वस्तावैया), 'सुन साथिया' (एबीसीडी २), 'अपना बना ले' (भेडीया) आणि 'माना के हम यार नहीं' (मेरी प्यारी बिंदू) यांचा समावेश आहे.
सचिन संघवी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात संगीत दिग्दर्शक प्रीतम यांना असिस्ट करत झाली होती. 'फ्रेश अरेंजमेंट्स' आणि 'मेलोडिक स्टाईल'साठी ही जोडी ओळखली जाते. अशा लोकप्रिय संगीतकारावर लैंगिक अत्याचारासारखा गंभीर आरोप झाल्याने बॉलिवूड आणि संगीत क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणी सचिन संघवी यांचे वकील आदित्य मिठे यांनी सांगितले की, एफआयआरमध्ये माझ्या क्लायंटविरुद्ध केलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत. या प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे अथवा कायदेशीर आधार नाही. माझ्या क्लायंटला पोलिसांनी केलेली अटक पूर्णपणे बेकायदेशीर होती आणि हाच मुख्य कारण आहे की त्यांना लगेचच जामिनावर सोडण्यात आले.
आम्ही या प्रकरणातील सर्व आरोपांचे संपूर्ण खंडन करत आहोत आणि न्यायालयात कायदेशीर पद्धतीने लढा देऊन सत्य बाहेर आणू, असे मिठे यांनी सांगितले.
