दमदार कथा, तगडी स्टारकास्ट आणि उत्कृष्ट दिग्दर्शन यामुळे 'दशावतार' सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. सिनेमाच्या शोमध्ये दुसऱ्या दिवशीच वाढ करण्यात आली होती. ज्याचा फायदा रविवारी झाला.
दशावतार सिनेमाने पहिल्याच दिवशी 58 लाखांची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या आकड्यात मोठी उडी घेत सिनेमाने 1.39 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशीही सिनेमाने चांगली कामगिरी केली. सिनेमानं तीन दिवसात 5.22 कोटींची कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात सिनेमानं बजेट वसूल केलं आहे.
advertisement
thetopindia.comच्या रिपोर्टनुसार, 'दशावतार' सिनेमाचं एकूण बजेट जवळपास 4 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. 3 दिवसांतच 5 कोटींची कमाई करून या सिनेमाने आपलं बजेट वसूल केलं आहे. येणाऱ्या आठवड्यात हा आकडा आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दशावतार हा सिनेमा सुबोध खानोलकर यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, भरत जाधव, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, आरती वडगबाळकर यांसारखे कलाकार यात प्रमुख भूमिकेत आहेत.
निर्माते, दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणाले, "दशावतार’ला मिळणारा हा प्रतिसाद म्हणजे आमच्यासाठी स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. दशावतारमधून कोकणातील कला आणि संस्कृतीसोबतच पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल केलेल्या भाष्याला प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे. प्रामाणिकपणे सांगितलेल्या गोष्टीला प्रेक्षक खुल्या मनाने स्विकारतात हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालंय. प्रत्येकाने घेतलेली मेहनत सार्थकी लागल्याचे समाधान आहे."
केवळ मुंबई-पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे बेळगाव, बेंगळुरु, इंदौर, हैद्राबाद आणि गोव्यातही हा सिनेमा प्रेक्षकांनी उचलून धरला आहे, असं झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी सांगितलं.