मुंबई: रुपेरी पडद्यावर आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाने अनेक दशके रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘हिमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांच्या जाण्याने अवघ्या देशभरातील सिनेप्रेमांमध्ये दु:खाची लाट उसळली. मात्र त्यांच्या निधनाच्या बातमीपासून ते अंत्यसंस्कारापर्यंत कुटुंबीयांनी ठेवलेली गुप्तता आणि पार्थिवावर केलेले घाईने अंत्यसंस्कार यावरून चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
advertisement
धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील जुहू येथील स्मशानभूमीत मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले. काही जवळचे कलाकार व कुटुंबीयांशिवाय कोणीही अंत्यविधीच्या ठिकाणी उपस्थित नव्हते. चाहत्यांना तर अंत्यदर्शनाची संधीही देण्यात आली नाही. धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती अधिकृतपणे कुटुंबीयांकडून देण्यात आली नव्हती. आज सकाळी धर्मेंद्र यांच्या घराबाहेर अचानक रुग्णवाहिका दिसल्याने चाहत्यांच्या मनात धस्स झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, रुग्णवाहिका आणि कुटुंबीयांची वाहने हे जुहू येथील अंत्यसंस्कारासाठी थेट दाखल झाले. त्याच दरम्यान, सूत्रांकडून धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती समोर आली. निधनाबाबत अधिकृत घोषणा न झाल्याने अनेक चाहत्यांना ही बातमी सोशल मीडियावरूनच कळली. आपल्या आवडत्या अभिनेत्याला शेवटचे पाहता न आल्याने चाहत्यांनीदेखील हळहळ व्यक्त केली.
निधनाची बातमी जाहीर का केली नाही?
धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त जाहीर न करण्यामागे काही शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असताना, त्यांच्या निधनाचे दावे करणारे वृत्त समोर आले होते. त्यावर देओल कुटुंबाने नाराजी व्यक्त केली होती. धर्मेंद्र यांच्या कुटु्ंबीयांसाठी त्यांचे निधन हा मोठा धक्का होता. अशावेळी कुटुंबीयांनी खासगी बाब म्हणून निधनाचे वृत्त जाहीर केले नसल्याची शक्यता आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांची गर्दी उसळली असती. त्याचा त्रास सामान्यांना झाला असता. त्यामुळे काही निकटचे नातेवाईक आणि कलाकारांना याची माहिती देण्यात आली.
कोणत्या कलाकारांची उपस्थिती?
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सिनेसृष्टीतील महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, लेखक सलीम जावेद, अभिनेता आमिर खान, सलमान खान, संजय दत्त, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार आदी कलाकारांनी धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप दिला.
