सायरस ब्रोचाच्या पॉडकास्टमध्ये संजय गुप्तांनी त्यांच्या ४० वर्षांच्या फिल्मी करिअरमधील अनेक किस्से सांगितले. ते म्हणाले, “अजय देवगण, हृतिक रोशन आणि अमिताभ बच्चन यांसारख्या जुन्या कलाकारांकडे आजही फक्त एक मेकअप मॅन आणि एक स्पॉट बॉय असतो.” पण, नव्या पिढीतील काही कलाकारांमुळे निर्मात्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड बसतो, असंही ते म्हणाले.
‘६ व्हॅनिटी व्हॅन मागतात!’
advertisement
संजय गुप्ता पुढे म्हणाले, “मी काही अशा कलाकारांना ओळखतो, जे सेटवर ६ व्हॅनिटी व्हॅन मागतात. पहिली व्हॅन त्यांची वैयक्तिक जागा असते, जिथे ते नग्न बसतात. दुसऱ्या व्हॅनमध्ये ते मेकअप आणि हेअर करतात, तिसऱ्या व्हॅनमध्ये मीटिंग्स घेतात, चौथी व्हॅन त्यांच्या जिमसाठी असते, तर पाचवी व्हॅन कर्मचाऱ्यांसाठी असते. सेटवर एक खास शेफही असतो, जो फक्त काही ग्रॅम जेवण बनवतो.”
“पती-पत्नी सेटवर वेगळ्या व्हॅन मागतात…”
संजय गुप्तांच्या मते, जर एखादं स्टार कपल असेल, तर परिस्थिती अजूनच वाईट होते. ते म्हणाले, “सेटवर ११ व्हॅन्स असतात! ते घरी एकत्र जेवत नाहीत का? ते पती-पत्नी आहेत, तरीही त्यांच्याकडे वेगळ्या किचन व्हॅन असतात! मी अजिबात अतिशयोक्ती करत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे.”
या सगळ्यामध्ये, संजय गुप्तांनी अमिताभ बच्चन यांचं खूप कौतुक केलं. ते म्हणाले, “मिस्टर बच्चन तुम्हाला त्यांच्या कर्मचाऱ्यांचं वेतन द्यायला कधीच सांगत नाहीत. ते म्हणतात, ‘हा माझा कर्मचारी आहे. त्यामुळे त्यांना मानधन देणं हे निर्मात्याचं काम नाही.’”