टप्पू सेनेच्या गप्पांमध्ये मोठा खुलासा
गोकुळधाममध्ये नुकताच महिला मंडळाच्या क्रिकेटमुळे खिडकीचा काच फुटण्याचा आणि त्यावरून भिडे-अय्यर यांच्यात झालेल्या गोंधळाचा भाग दाखवण्यात आला. आता हा सर्व गोंधळ मिटल्यावर टप्पू सेनेच्या गप्पा सुरू असताना हा मोठा खुलासा झाला.
सर्व काही पूर्ववत झाल्यावर टप्पू सेनेचे सदस्य गप्पा मारत असताना गोलीने एक कल्पना सुचवली. तो म्हणाला, 'आपण टप्पू सेना आणि महिला मंडळ यांची क्रिकेट मॅच ठेवायला हवी.' यावर पिंकू म्हणाला की, मग पुरुष मंडळी पण यात सहभागी होतील. लगेच टप्पूने सर्वांना GPL (गोकुळधाम प्रीमियर लीग) ची आयडिया दिली. ही आयडिया ऐकून सर्वजण खूप उत्साही झाले.
"आई आल्यावर GPL मध्ये जास्त मजा येईल!"
GPL ची तयारी सुरू असतानाच टप्पूने ही सर्वात मोठी गुडन्यूज दिली, जी ऐकून गोकुळधामचे नागरिक आणि प्रेक्षक आनंदी झाले आहेत. टप्पू म्हणाला, "माझी मम्मीही लवकरच गोकुळधाममध्ये परत येणार आहे." हे ऐकून सोनूने लगेच विचारले, "काय, दया आंटी येत आहेत? मग तर गोकुळधामची शोभा आणखी वाढेल. दया आंटीच्या गोड किलबिलाटाने गोकुळधाम पुन्हा चमकेल."
टप्पूने आनंदाने सांगितले की, 'एकदा आई आली की, GPL मध्ये जास्त मजा येईल.' सोनूनेही लगेच त्याला दुजोरा देत म्हटले, "दया आंटीशिवाय GPL मध्ये मजा नाहीच." आता 'टप्पू'ने अधिकृतपणे घोषणा केल्यामुळे दयाबेन कधी परत येते आणि गोकुळधाममध्ये 'गरबा क्वीन' चा आवाज कधी घुमतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
