कन्नड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या जबरदस्त कॉमेडीने प्रेक्षकांना हसवणारे आणि 'बिग बॉस कन्नड'मुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते राजू तालिकोटे यांचे अकाली निधन झाले आहे. सोमवारी कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील मणिपाल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एका चित्रपटाच्या शूटिंगनंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
advertisement
शूटिंगनंतर अचानक तब्येत बिघडली
राजू तालिकोटे यांच्या निधनाने संपूर्ण साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजू तालिकोटे उडुपी येथे त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होते. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांनी त्यांच्या दिवसाचे शूटिंग पूर्ण केले. त्यानंतर त्यांना अचानक खांद्यामध्ये वेदना सुरू झाल्या. काही वेळातच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. प्रकृतीची गंभीर अवस्था लक्षात घेऊन त्यांना तातडीने मध्यरात्री मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात यश आले नाही.
तिसऱ्या झटक्याने घेतला जीव
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेते राजू तालिकोटे यांना यापूर्वीही दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले होते. ही तिसरी वेळ होती आणि यावेळी मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला. राजू तालिकोटे यांच्या निधनाने त्यांच्या शेवटच्या चित्रपटातील सहकलाकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. एका सहकलाकाराने सांगितले की, राजू तालिकोटे आता आपल्यात नाहीत, यावर माझा विश्वास बसत नाहीये. त्यांनी केवळ दोन दिवसांचे शूटिंग पूर्ण केले होते.
स्टँड-अप कॉमेडियन ते सुप्रसिद्ध अभिनेता
विजयपुरा येथे जन्मलेल्या राजू तालिकोटे यांनी आपल्या करियरची सुरुवात एक स्टँड-अप कॉमेडियन म्हणून केली होती. आपल्या उत्कृष्ट विनोदी अभिनयाच्या जोरावर त्यांनी हळूहळू कन्नड चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले.
२००९ मध्ये आलेल्या 'मनसरे' या चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर 'लाइफ इज दॅट', 'टोपीवाला', 'राजधानी', 'मैना' आणि 'अलेमारी' अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. ते केवळ चित्रपटांपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर त्यांनी लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस कन्नड'च्या सातव्या पर्वातही सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनामुळे कन्नड मनोरंजन क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.