बरेली: अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री उशिरा तिच्या घरावर हा हल्ला झाला. या घटनेनंतर एका सोशल मीडिया पोस्टमध्ये या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली असून, त्यात बॉलिवूडला थेट धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा दिशा पाटनीच्या घराबाहेर गोळीबाराचे अनेक आवाज ऐकू आले. पहाटे साडेचारच्या सुमारास हवेत दोन गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
सोशल मीडियावर पोस्ट...
या गोळीबारानंतर सोशल मीडियावर एक युझरने पोस्ट शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हिंदी भाषेत लिहिलेल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की- आज जो गोळीबार दिशा पाटनीच्या घरावर झाला, तो आम्ही केला आहे. तिने आमचे आदरणीय संत प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य महाराज यांचा अपमान केला आहे. तिने आमच्या सनातन धर्माला कमी लेखण्याचा प्रयत्न केला.
पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, हा तर फक्त ट्रेलर आहे. पुढील वेळी जर तिने किंवा इतर कोणीही आमच्या धर्माचा अनादर केल्यास त्यांच्या घरात कोणीही जिवंत राहणार नाही. हा संदेश केवळ तिलाच नाही, तर संपूर्ण चित्रपटसृष्टीला आहे. आमच्या धर्माच्या रक्षणासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ.
या पोस्टनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, त्या पोस्टची सत्यता पडताळली जात आहे. दिशा पाटनीची धाकटी बहीण खुशबू पाटनीनेही या घटनेबद्दल पोलिसांकडे तक्रार केली आहे. सध्या पोलिस गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.