सध्या मालिकेत ऋषिकेश, जानकी आणि रणदिवे कुटुंबाच्या आयुष्यात ऐश्वर्या आणि मास्कमॅनमुळे गोंधळ सुरू आहे. पण, आता प्रेक्षकांना जानकी आणि ऋषिकेशच्या संसाराची सुरुवात कशी झाली, त्यांची पहिली भेट ते लग्न हा प्रवास कसा होता, हे पाहता येणार आहे. हा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला होता, याची रंजक गोष्ट आता समोर येणार आहे. या फ्लॅशबॅक कथानकात एक मोठा ट्विस्ट आहे. १२ वर्षांपूर्वीदेखील जानकी-ऋषिकेशच्या प्रेमकथेमध्ये मकरंद नावाचे एक मोठे वादळ उभे राहिले होते.
advertisement
मकरंद नेमका कोण?
ऋषिकेश-जानकीच्या प्रेमात अडथळे आणण्यामागे त्याचा नेमका मनसुबा काय होता? या सर्व प्रश्नांची उत्कंठावर्धक उत्तरे प्रेक्षकांना आता या नवीन ट्रॅकमुळे मिळणार आहेत. या अनोख्या वळणाबद्दल बोलताना ऋषिकेशची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे खूप उत्साहित दिसला. तो म्हणाला, "मालिकेतल्या या नव्या कथानकासाठी आम्ही सगळेच खूप उत्सुक आहोत."
आजवर प्रेक्षकांनी ऋषिकेशला शांत, संयमी आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारा पाहिला आहे. पण, १२ वर्षांपूर्वी ऋषिकेशचा स्वभाव खूप वेगळा होता, याकडे सुमीतने लक्ष वेधले. सुमीत म्हणाला, "या भूमिकेमध्ये खूप पैलू आहेत. बारा वर्षांपूर्वी जानकी आणि ऋषिकेश नेमके कसे होते, हे साकारताना खूप धमाल येणार आहे. आमचे लूकही खूप छान झाले आहेत. प्रेक्षकांना हा नवा ट्रॅक नक्की आवडेल, याची खात्री आहे."
मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासातील हा पहिलाच प्रयोग असल्याने, 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेचा हा फ्लॅशबॅक ट्रॅक नक्कीच पाहण्यासारखा असणार आहे.
