Guru Thakur Song Hi Pori Sajuk Tupatali : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गीतकार, पटकथा, संवादलेखक, अभिनेता गुरू ठाकूर सध्या 'दशावतार' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अशातच एबीपी माझाच्या 'माझा कट्ट्या'वर गुरू ठाकूर यांनी 'ही पोली साजूक तुपातली' या सुपरहिट गाण्याच्या मेकिंगचा किस्सा शेअर केला आहे. विशेष बाब म्हणजे पायऱ्यांवर बसून त्यांनी हे गाणं लिहिलं होतं. 3 जानेवारी 2014 रोजी रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रथमेश परब-केतकी माटेगावकरची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण त्यासोबतच या चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट ठरली. त्यातीलच एक गाणं म्हणजे,"ही पोली साजूक तुपातली, तिला माहवऱ्याचा लागलाय नाद". आजही अनेक हळदींमध्ये हे गाणं हमखास वाजवलं जातं.
advertisement
कसं तयार झालेलं 'ही पोली साजूक तुपातली'?
एबीपी माझाच्या 'माझा कट्ट्या'वर गुरू ठाकूर यांना कोणतं असं गाणं होतं जे कसंबसं लिहिलं पण ते नंतर यशस्वी झालं? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत गुरू ठाकूर म्हणाले,"टाइमपास' हा चित्रपट मी केला होता. या चित्रपटातील एक गाणं मी केलं आहे. चिनार महेश या गाण्याचे संगीतकार होते. रविवारी सकाळी या गाण्यासाठी आम्ही स्टुडिओमध्ये भेटणार होतो. मी वेळेत पोहोचलो नॉक केलं तर कोणीच आलेलं नव्हतं. बराच वेळ मी नॉक केलं. वैतागलो होतो. आणि तिथेच चिडलेल्या अवस्थेत जिन्यात बसून एक गाणं लिहिलं आणि दरवाज्याला लावलं. त्यात लिहिलं होतं,"यात एकही बदल होणार नाही". हे गाणं कंपोज केलं ते हिट झालं हे गाणं होतं "ही पोली साजुक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद".
Dashavatar : 'दशावतारातील' एका सीनसाठी दिलीप प्रभावळकरांनी मारलेली खाडीत उडी; आठवणीत रमले बाबुली मेस्त्री
मनात प्रचंड राग, खूप चिडचिड झालेली असताना गुरू ठाकूर यांनी "ही पोली साजुक तुपातली" हे गाणं लिहिलं. त्यांच्यामते, गाणं करताना त्यात कवी न दिसता ते पात्र दिसलं पाहिजे". झी म्युझिकने युट्युबवर शेअर केलेल्या या गाण्याला आतापर्यंत 18 कोटींपेक्षा अधिक वह्यूज मिळाले आहेत. या दमदार गाण्याचे बोल गुरू ठाकूर यांचे असून चिनार महेश यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर रेश्मा सोनावणे यांनी हे गाणं गायलं आहे. शिवानी दांडेकर यावर थिरकली होती. आजही शहरी भागासह खेड्यापाड्यांतील तरुण मंडळी या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसून येतात.