सप्टेंबर २०२५ मध्ये सोशल मीडियावर रीता भट्टाचार्य यांच्या काही मुलाखती वाऱ्यासारख्या पसरल्या. या मुलाखतींमध्ये रीता यांनी कुमार सानू यांच्याबद्दल जे काही सांगितलं, ते ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला. रीता यांनी असा दावा केला की, "जेव्हा मी गरोदर होते, तेव्हा सानूंनी माझ्यावर प्रचंड अत्याचार केले. त्यांनी मला किचनमध्ये डांबून ठेवलं होतं, मला साध्या दुधासाठी आणि वैद्यकीय मदतीसाठी तरसावं लागलं. इतकंच नाही, तर त्यांनी मला उपाशी ठेवलं आणि अनेक अफेअर्स करून कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं." हे आरोप समोर येताच कुमार सानू यांची प्रतिमा डागाळली गेली आणि सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.
advertisement
रीता यांच्या आरोपांवर कुमार सानू यांचा संताप
आपल्या प्रतिमेला धक्का लागलेला पाहून कुमार सानू यांनी गप्प न बसता थेट कायदेशीर लढाई पुकारली आहे. त्यांनी 'बिग बॉस १७' फेम प्रसिद्ध वकील सना रईस खान यांच्यामार्फत बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली आहे. १७ डिसेंबर २०२५ रोजी या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली.
कुमार सानू यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे की, रीता भट्टाचार्य यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आणि बदनामी करणारे आहेत. केवळ खळबळ माजवण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी हे जुने किस्से उकरून काढले जात आहेत. यामुळे सानू यांना प्रचंड मानसिक त्रास झाला असून त्यांची सामाजिक प्रतिष्ठा मलीन झाली आहे.
रीता यांनी केला न्यायालयाच्या अटीचा भंग?
या वादात एक महत्त्वाची तांत्रिक बाब समोर आली आहे. कुमार सानू आणि रीता यांचा घटस्फोट २००१ मध्ये झाला होता. त्यावेळी कोर्टाने दोघांमध्ये एक अट घातली होती, 'दोन्हीपैकी कोणताही पक्ष भविष्यात एकमेकांवर जाहीरपणे चिखलफेक किंवा आरोप करणार नाही.' सानू यांच्या वकिलांच्या मते, रीता यांनी या अटीचा भंग केला असून हा न्यायालयाचा अवमान आहे.
कुमार सानू आणि रीता यांचा मुलगा जान कुमार सानू हा देखील 'बिग बॉस १४' मध्ये दिसला होता. त्यावेळीही वडील आणि मुलाच्या नात्यावरून बरीच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा हे कुटुंब वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. सानू यांनी मागणी केली आहे की, ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक मुलाखती आहेत, त्या तातडीने हटवण्यात याव्यात.
