मुंबई महानगरपालिकेच्या 'मुंबई क्लीन लीग' या कार्यक्रमाला अक्षय कुमारने हजेरी लावली होती. बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या 'मुंबई क्लीन लीग' या कार्यक्रमात अक्षयने मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी एक नवीन कल्पना मांडली. अक्षयला आयपीएलच्या धर्तीवर मुंबईत स्वच्छतेची स्पर्धा सुरू करण्याची कल्पना सुचली. त्यानुसार 'मुंबई क्लीन लीग' सुरू करण्यात आली आहे. ही स्पर्धा डिसेंबरपर्यंत चालेल, ज्यात गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स, रुग्णालये आणि झोपडपट्टी भागांना सहभागी होता येईल. स्वच्छतेचे फोटो अपलोड करण्यासाठी बीएमसीकडून एक विशेष QR कोडही जारी केला जाणार आहे.
advertisement
ट्विंकल खन्नालाही सतावतेय गॅस टंचाईची चिंता
या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी त्याला देशातील गॅस टंचाईबाबत विचारले असता तो म्हणाला, सध्यातरी आमच्या घरात गॅसची काहीही टंचाई नाही आहे. पण माझी पत्नी ट्विंकल खूप सतर्क आहे. भविष्याची खबरदारी म्हणून तिने आधीच आधीच दोन इंडक्शन शेगड्या ऑर्डर केल्या आहेत. त्या घरी पोहोचल्या आहेत की नाही, हे मला माहीत नाही, पण तिने बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय." त्याच्या या हजरजबाबीपणामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबद्दल (AQI) विचारले असता अक्षयने सकारात्मक भूमिका मांडली. तो म्हणाला, "प्रत्येक गोष्टीमध्ये चुका काढणे बंद करा. जर एका खोलीत दहा बल्ब असतील आणि एक बल्ब चालत नसेल, तर त्यावरच लक्ष केंद्रित करण्यापेक्षा बाकीच्या नऊ चालणाऱ्या बल्बांकडे बघा."
कामाबद्दल बोलायचे झाले तर, अक्षय लवकरच प्रियदर्शन यांच्या 'भूत बंगला' या हॉरर कॉमेडीमध्ये दिसणार आहे. याशिवाय 'हायरान', 'वेलकम टू द जंगल' आणि 'हेरा फेरी ३' यांसारखे मोठे चित्रपट देखील त्याच्या रांगेत आहेत.
