ममताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणतेय, ''हाय दोस्तो. मी ममता कुलकर्णी आणि मी 25 वर्षांनी भारत, बॉम्बे, मुंबई, आमच्या मुंबईमध्ये आले आहे. मी 2000 साली भारतातून बाहेर गेले होते आणि बरोबर 2024 मध्ये इथे परत आले आहे.''
advertisement
ममता पुढे म्हणतेय, ''मी खूप खुश आहे आणि मला माहिती नाही की हा आनंद मी कसा व्यक्त करू. मी भावुक आहे. मी जेव्हा फ्लाइटमधून लँड झाले किंवा फ्लाइट लँड होण्याआधी मी माझ्या आजूबाजूला पाहत होते. मी 24 वर्षांनी माझ्या देशाला वरून पाहत होते. मी खूप भावुक झाले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी माझं पाऊल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर ठेवलं आणि भारावून गेले.''
2016 मध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीचं नाव ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटमधील एक आरोपी म्हणून नोंदवले होते. मेथॅम्फेटामाइनच्या अवैध उत्पादनासाठी इफेड्रिनचा पुरवठा केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. यात तिला तिचा नवरा विकी गोस्वामीने मदत केली होती. त्यानंतर दोघेही फरार झाल्याचे वृत्त आहे.
फरार आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर आणि तिचा पती विकी गोस्वामीसह, ममता गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात वास्तव्यास होती. 2016 साली, ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात ममताचा सहभाग होता हे सिद्ध करणारे पुरावे नाही, असं हायकोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर ममता यांनी आपल्या विरोधात अमली पदार्थ तस्करी प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अमली पदार्थ तस्करी आरोपातून ममता निर्दोष असून तिच्याविरोधातील गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला.