केवळ आपल्या मातृभाषेतल्या चित्रसृष्टीत किंवा बॉलिवूडमध्ये काम करण्याचे दिवस आता संपले. आता मराठी कलाकार अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसू लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा पसारा खूप मोठा आहे. तसंच तिथे मिळणारं मानधनही तुलनेनं जास्त असतं. त्यामुळे मराठी कलाकारांचा तिथे ओढा असतो. आता अनेक मराठी कलाकारांना त्यांचा पहिला ब्रेक दाक्षिणात्य चित्रपटात मिळतो. खरं तर याची सुरुवात याआधीच्या पिढीपासूनच झाली होती. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांनीही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
advertisement
25 व्या वर्षी अभिनेत्री झाली विधवा, नंतर 20 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत केलं दुसरं लग्न!
मराठीच्या बरोबरीनं हिंदी चित्रपटांमध्ये दिसलेला एक मराठी कलाकार म्हणजे सचिन खेडेकर. व्ही. के. प्रकाश यांच्या ‘पोलीस’ या मल्याळी चित्रपटातून त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यात पृथ्वीराज सुकुमारन, इंद्रजित सुकुमारन, भावना, छाया सिंग आणि अशोकन यांच्यासह सचिन यांची मुख्य भूमिका होती.
उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक असलेले महेश मांजरेकर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सहजतेनं वावरतात. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही त्यांनी काम केलं आहे. चंद्रशेखर येलेटी यांच्या ‘ओक्काडून्नाडू’ या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. त्यात गोपीचंद आणि नेहा झुल्का यांच्याही भूमिका होत्या.
गेल्या काही वर्षांत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत ज्या मराठी कलाकारांचा प्रभाव होता, त्यांपैकी एक नाव म्हणजे सयाजी शिंदे. त्यांनी तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळी, हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती, भोजपुरी इतक्या भाषांमधले चित्रपट केले आहेत. त्याशिवाय मराठी नाटकांमध्येही काम केलं आहे. दक्षिणेतल्या ‘पतीथ पावनी’ या 1971 मधील चित्रपटाद्वारे त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. हा चित्रपट एफ. डी. साली यांनी दिग्दर्शित केला होता.
जुन्या पिढीतल्या कलाकारांप्रमाणेच नव्या पिढीतले अनेक कलाकारही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे शरद केळकर. हलचल या चित्रपटाद्वारे त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट त्यानं केले. तसंच त्यानं सरदार गब्बर सिंग या तेलुगू चित्रपटातही काम केलं आहे. त्यात पवन कल्याण आणि काजल अगरवाल यांनी त्याच्यासह भूमिका केल्या आहेत.