दिलजीत दोसांझला नसीरुद्दीन शाह यांचा पाठिंबा
दिलजीत दोसांझ आणि पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर यांचा 'सरदराजी ३' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी असल्यामुळे हा चित्रपट भारतात प्रदर्शित न करता, पाकिस्तानसह इतर देशांत प्रदर्शित करण्यात आला. हा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांचा होता, असं दिलजीतने माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं. तरीही, काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटात काम केल्याने आणि तो चित्रपट प्रदर्शित केल्याने दिलजीतला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.
advertisement
दिलजीतवर होत असलेल्या या टीकेनंतर नसीरुद्दीन शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला पाठिंबा दिला आणि आपली प्रतिक्रिया नोंदवली. परंतु, त्यांनी ती पोस्ट आता डिलीट केली आहे.
नसीरुद्दीन शाह यांची नवी, सूचक पोस्ट
आपली आधीची पोस्ट डिलीट करून नसीरुद्दीन शाह यांनी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी जॉर्ज क्रिस्टोफ लिक्टेनबर्ग या शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञांचं एक विधान पोस्ट केलं आहे. ते म्हणतात, “जेव्हा सगळे एखाद्या व्यक्तीला समजून न घेता, त्याच्यावर निशाणा साधतात तेव्हा तिथे सत्याच्या बाजूनं बोलणं किंवा आपली बाजू मांडणं अशक्य असतं.” नसीरुद्दीन शाह यांनी हे विधान शेअर करत आपला मुद्दा अधिक व्यापकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या नवीन पोस्टवरही सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी नसीरुद्दीन शाह यांना 'तुमचं मत मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे' असं म्हणत पाठिंबा दिला, तर काहींनी दिलजीतला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना अजूनही ट्रोल केलं.
आधीच्या पोस्टमध्ये काय म्हटलं होतं नसीरुद्दीन शाह यांनी?
नसीरुद्दीन शाह यांनी यापूर्वी एक्स (ट्विटर) आणि फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये दिलजीतला थेट पाठिंबा दिला होता. ते म्हणाले होते, "माझा दिलजीतला पाठिंबा आहे. जुमला पार्टी घाणेरडे आरोप करून दिलजीतवर निशाणा साधत आहेत; पण चित्रपटाच्या कास्टिंगचा निर्णय हा त्याचा नव्हताच."
नसीरुद्दीन पुढे म्हणाले होते की, "चित्रपटासाठी कोणत्या कलाकारांची निवड करायची हा निर्णय दिग्दर्शकाचा होता. पण तो कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही. सगळे दिलजीतवर टीका करीत आहेत. त्याने फक्त चित्रपटासाठी निवड झालेल्या कलाकारांसह काम केलं आहे; काही वाईट केलेलं नाही. या लोकांना भारत-पाकिस्तानमधील लोकांमध्ये वाद निर्माण करायचे आहेत. पाकिस्तानमध्ये माझे काही नातेवाईक व मित्र राहतात आणि त्यांना भेटण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही."
नसीरुद्दीन शाह यांनी ही पोस्ट सोमवारी ३० जून रोजी शेअर केली होती, परंतु आता ती डिलीट करण्यात आली आहे. त्यांच्या या कृतीमुळे आणि नवीन सूचक पोस्टमुळे त्यांच्या भूमिकेबद्दल आणि त्यांना सहन कराव्या लागलेल्या टीकेबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.