लातूरमध्ये आकाश ठोसरसाठी तुफान गर्दी
मुंबईत रवीना टंडन मशाल घेऊन फिरत असतानाच, तिकडे लातूरचं राजकीय वातावरण सैराट झालं आहे. मराठी सिनेसृष्टीचा हँडसम हंक आकाश ठोसर आपल्या आवडत्या उमेदवारासाठी चक्क रस्त्यावर उतरला आहे. लातूरमधील प्रभाग १ चे काँग्रेस उमेदवार गोपाळ बुरबुरे यांच्या प्रचारासाठी आकाशने हजेरी लावली. तर दुसरीकडे डान्सर गौतमी पाटीलने चंद्रपुरात धुमाकूळ घातला आहे.
advertisement
चंद्रपुरात गौतमी पाटीलचा जलवा
चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रचारात तर काँग्रेसने थेट गौतमी पाटीललाच मैदानात उतरवून विरोधकांचे धाबे दणाणून सोडले आहेत. काँग्रेसच्या भव्य प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबतच गौतमीची उपस्थिती सर्वांचे आकर्षण ठरली.
यावेळी गौतमीने प्रचार सभेत मतदारांना संबोधित केलं. गौतमी म्हणाली, "महिलांचा हा जोश मला खूप आवडला. मी नेहमीच महिलांसाठी उभी असते. पण आज जो जोश मी पाहिला, असाच जोश कायम ठेवायचा आहे. आपला काँग्रेस पक्ष बहुमताने विजयी करायचा आहे."
गौतमीने पुढे विजय वडेट्टीवार यांचेही आभार मानले. ती म्हणाली, "विजय भाऊंचं कलाकारांवरचं प्रेम खूप छान आहे. त्यांचा नेहमीच मला आशीर्वाद आणि सपोर्ट असतो. मी इथे आले, त्यावरून मला खूप प्रश्न विचारले गेले. पण मी त्यांना एकच म्हटलं, ज्यांना जे बोलायचं ते बोलू दे. त्यांचं खूप प्रेम आहे आमच्यावर, ते दाखवत असतात ते प्रेम. तर त्यांना ते दाखवू दे. आपला चाहतावर्ग जास्त आहे. तर त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांच्या सपोर्टमुळे आज आपण आहोत."
चंद्रपूरच्या या सभेत केवळ राजकीय घोषणाच नाही, तर गौतमीला पाहण्यासाठी आलेल्या हजारो लोकांच्या गर्दीने सभास्थळ अपूरं पडलं. गौतमीच्या उपस्थितीमुळे या सभेची चर्चा जिल्हाभर रंगली असून, काँग्रेसने या माध्यमातून तरुणांची मोठी फळी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.
नेत्यांपेक्षा कलाकार भारी पडणार?
निवडणूक म्हटली की फोडाफोडी आणि आरोप-प्रत्यारोप आलेच, पण यंदा ज्या पद्धतीने हे कलाकार थेट जमिनीवर उतरून प्रचार करत आहेत, त्याने चुरस अधिक वाढली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या कलाकारांमुळे सभेला गर्दी तर जमते, पण ही गर्दी मतांच्या रूपाने पेटीत पडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण तूर्तास तरी, नेत्यांच्या भाषणांपेक्षा या ताऱ्यांच्या फोटो आणि व्हिडिओंनीच सोशल मीडिया व्यापून टाकला आहे.
