२००९ साली महेश मांजरेकरांचा 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला एक नवी दिशा दिली होती. सचिन खेडेकर, सुचित्रा बांदेकर, प्रिया बापट आणि अभिजीत केळकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. आता तब्बल १६ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग 'पुन्हा शिवाजी राजे' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
सिनेमामध्ये तगडी स्टार कास्ट
पुन्हा शिवाजी राजे हा सिनेमा ३१ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार असून संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याला विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप यांसारख्या कलाकारांची तगडी साथ मिळाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
नुकतंच सिनेमाच्या टीमने भिवंडीमधील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट दिली. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेती त्रिशा ठोसरने खणखणीत आवाजात शिवगर्जना म्हटली. तिने शिवगर्जना करताच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्याच अंगावर शहारे आले. राजश्री मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी लहानग्या त्रिशावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
शेतकरी आत्महत्येसारख्या ज्वलंत विषयाला घातला हात
पुन्हा शिवाजी राजे हा चित्रपट फक्त इतिहासावर आधारित नाही, तर तो वर्तमान आणि इतिहास असा सुंदर संगम साधतो. यात मराठीची अस्मिता, बळीराजाच्या आत्महत्यांचा गंभीर प्रश्न, मुंबईतील मराठी माणसाचे स्थान, परप्रांतीयांची मुजोरी अशा अनेक ज्वलंत विषयांवर महाराजांचे भाष्य आणि कृती पाहायला मिळणार आहे.
