कसा मिळाला 'फुलवरा'?
आख्यानाचा निवेदक ईश्वर अंधारे यानं न्यूज 18मराठीशी एक्सक्लुसिव्ह बोलताना, 'फुलवरा' या सिनेमात फोक आख्यानच्या कलाकारांची वर्णी कशी लागली याबद्दल सांगितलं. ईश्वरने सांगितलं, "फोक आख्यान हा लोककलेचा सांगेतिक थाट आम्ही सादर करतो. अशा एका थाटाला रवी सरांची उपस्थिती होती. त्यांना तो शो खूप आवडला. आवडला या शब्दाच्या पलिकडे होतं त्यांच्यासाठी सगळं. त्यांना ते आवडल्यानंतर त्यांनी त्यावर लगेच रिअॅक्ट केलं नव्हतं. त्यानंतर त्यांनी आमच्या टीममधून आमच्या तिघांचे हर्ष-विजय आणि माझा नंबर मिळवला. त्यानंतर त्यांचा कॉल आला. मला तुम्हाला भेटायचं आहे कधी येऊ शकता असं त्यांनी विचारलं. आम्हाला आधी वाटलं की मुंबईच्या एका प्रयोगाला ते आम्हाला बोलावणार असतील. आम्ही विचारलं कुठे भेटायचं तर ते म्हणाले की, माझ्या घरी या तुम्ही भेटायला.आम्ही घरी गेलो. तेव्हा त्यांनी सिनेमाबद्दल सांगितलं."
advertisement
( 'नटरंग'नंतर 15 वर्षांनी नवा तमाशापट, रवी जाधव यांची 'फुलवरा' प्रेक्षकांच्या भेटीला, फर्स्ट पोस्टर )
ईश्वर म्हणाला, "आतापर्यंत मला आठवत नाही एखाद्या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज होतं तेव्हा त्यात कथा-पटकथा-गीत-संगीत यांना त्या पोस्टरमध्ये सुरुवातीलाच मान दिला जातो. रवी सरांचं जसं नाव आहे तसंच आमचं तसंच निर्मात्यांचं. इतकी जबाबदारी आणि प्रेम त्यांनी दिलं आहे. रवी सरांसारखं स्वातंत्र्य आम्हाला कुणीच देत नाही."
"ते म्हणतात, तुमच्या मनाला जे वाटेल ते करा, जग काय विचार करेन याचा विचार करू नका. पोटतिडकीने करा. ते मला डायरेक्ट म्हणाले की, या सिनेमाची कथा-पटकथा-संवाद तू करणार आणि हर्ष -विजय तुम्ही याच म्युझिक करणार. त्यांनी जसं लिहिलंय की , देवीचा आशीर्वाद, तसं आम्ही म्हणतो आम्हाला रवी सरांचा आशीर्वाद आहे. आम्हाला त्यांनी ही संधी दिली ही खूप मोठी गोष्ट आहे. रवी सर आणि आख्यानाच्या कृपेने आम्हा तिघांसाठी घडलेली ही गोष्ट आहे", असंही ईश्वरने सांगितलं.
स्वप्न पूर्ण झालं
ईश्वरने सांगितलं, "तुम्हाला कुठेतरी या क्षेत्राचं वेड लागतं, तुम्ही ऐकांकिकापासून प्रवास करता, त्यानंतर मोठी नाटके, मालिका वगैरे असा ज्याचा त्याचा प्रवास असतो. अशा गोष्टी आपल्यासोबत घडाव्या असं स्वप्न असतं. जेव्हा त्या घडतात तेव्हा त्याचं कौतुक कमी होतं आणि ज्याने आपल्यासाठी ते घडवून आणलंय त्याचं कौतुक जास्त होतं."
"रवी जाधव यांच्या सारख्या माणसाला जेव्हा अस्सल मातीचं वेड लागून तो नवख्या पोरांवर विश्वास टाकतो, ही फार मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट घडतेय हे पचवण्यासाठीही वेळ लागतोय. जबाबदारी वाढली आहे. सगळ्यांचा सकारात्मक रिप्लाय आहेत. खूप पॉझिटिव्ह एनर्जी देणारं आहे असं म्हटलं जात आहे. चांगल्या अर्थाने अस्वस्थ करणारी गोष्ट आहे."
"हे घडतंय, आपल्यासाठी दारं उघडली जात आहेत, आपल्यावर एवढा मोठा माणूस विश्वास ठेवतोय. आम्ही तिघांनी रंगपंढरी नावाचा आमचा शो करताना ते आतपर्यंत जी स्वप्न पाहिली होती ती आज रवी सरांमुळे कुठेतरी पूर्ण होत आहेत", अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.