रिंकू राजगुरूचा 'आशा' हा मराठी सिनेमा येत्या 19 डिसेंबरला रिलीज होतोय. सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. रिंकूचा एक दमदार आणि बिनधास्त अवतारा यात पाहायला मिळतोय. आशाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांची मनं जिंकलीत. 2 मिनिटं 18 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये रिंकूने आपल्या जबरदस्त अभिनयानं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या ट्रेलरचा शेवट मात्र अजिबात चुकवू नका.
advertisement
'बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये' अशी टॅगलाईन घेऊन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात रिंकू राजगुरू आशा सेविकेची भूमिका साकारत आहे. जी सायकलवर बसून गावागावांतील लोकांपर्यंत पोहोचते, अशी झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास 'आशा'मधून उलगडण्यात येणार आहे. ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेल्या आशाचे अनेक पैलू दिसत आहेत. गावोगावी लोकांच्या आरोग्याची जबाबदारी पेलणे, कुटुंबातील ताणतणावांना सामोरं जाणं, अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहाणं आणि स्वतःचं ध्येय साध्य करण्याची न थकणारी धडपड. तिच्या आयुष्यातील धग, वेदना आणि तळमळ दाखवण्यात आली आहे.
रिंकुबरोबरच या सिनेमात अभिनेता सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्याही महत्त्वाच्या भुमिका आहेत. सामाजिक वास्तव, महिलांवर येणारे अनेक कठोर निर्णय, भावनिक दडपण आणि अस्मितेची लढाई या सगळ्यांचा प्रभावी संगम सिनेमात दिसणार आहे. 'आशा' ही केवळ एका सेविकेची कथा नाही, तर सर्व स्तरांवर दररोज लढणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे.
आशा सिनेमात रिंकू राजगुरूचा अभिनय अधिक प्रगल्भ झाल्याचं दिसतोय. सैराटमधील रिंकू आणि आशामधील रिंकू यांच्यात खूप फरक जाणवतोय. त्याचप्रमाणे आशा या सिनेमासाठी रिंकूला सर्वात्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देखील देण्यात आला आहे. त्यामुळे आशामधील रिंकूचं काम हे उल्लेखनीय ठरलं आहे. आता रिंकूची आशा आर्चीवर वरचढ ठरणार का हे 19 डिसेंबरलाच कळणार आहे.
