अजित दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय क्षेत्रासोबतच कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. अभिनेता रितेश देशमुखही दादांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचला. रितेश सध्या 'बिग बॉस मराठी 6' च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तरी त्याने वेळ काढत अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत उपस्थिती लावली. शूटिंगच्या धावपळीतून थेट बारामतीत येत त्याने दादांच्या शेवटची अखेरची भेट घेतली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 'बिग बॉस मराठी 6' मध्ये 'भाऊचा धक्का' या विशेष एपिसोडचं शूटिंग होणार आहे. मात्र शूटिंग सुरू होण्याआधीच रितेश देशमुख बारामतीत पोहोचला. अजित दादांना पुष्पचक्र वाहून त्याने अंत्यदर्शन घेतलं आणि श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी रितेश अत्यंत भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
रितेश देशमुख आणि अजित पवार यांच्यातील आपुलकीचं नातं अनेकांना माहीत आहे. सामाजिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही रितेश अनेकदा अजित दादांबद्दल आदर व्यक्त करताना दिसला आहे. त्यामुळेच, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून अंत्यसंस्काराला हजेरी लावली.
अजित दादांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर रितेशनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्याने म्हटलं, "अजित दादांना एका दुर्दैवी अपघातात गमावल्याची बातमी ऐकून धक्का बसला. हृदय हेलावून गेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक गतिमान नेत्यांपैकी ते एक होते. कामात हलगर्जीपणा त्यांना अजिबात मान्य नव्हता आणि त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला उत्तम काम करण्यासाठी ते सतत प्रेरित करायचे. ते कधीही शब्द मोजून बोलले नाहीत. त्यांचा हजरजबाबीपणा अप्रतिम होता आणि संपूर्ण राज्याचं त्यांच्यावर भरभरून प्रेम होतं."
रितेशनं पुढे लिहिलंय, "त्यांचं अकाली जाणं ही अतिशय मोठी हानी असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्याशी अनेक वेळा संवाद साधण्याचा मला योग आला होता आणि त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमळ वागणुकीसाठी ते माझ्या कायम आठवणीत राहतील. पवार कुटुंबीय, त्यांचे जवळचे आणि कोट्यवधी समर्थक यांच्याप्रती माझ्या मनापासून संवेदना."
