पुण्याजवळील एक अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य मंदिर पाहायला मिळत आहे. तलावाच्या किनारी वसलेले हे मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा हिरवागार परिसर पाहून अनेकजण थक्क होत आहेत. शांत वातावरण, पाण्याचा निळसर रंग आणि सभोवतालचा हिरवा निसर्ग यामुळे हे ठिकाण पाहताक्षणीच मनाला प्रसन्नता मिळते.
advertisement
या सुंदर ठिकाणाचे नाव रामदरा आहे. रामदरा मंदिर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असून पुणे–सोलापूर महामार्गावर असलेल्या लोणी काळभोर गावाजवळ वसलेले आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे मंदिर एक वेगळाच अनुभव देणारे आहे. रामदरा हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर निसर्गप्रेमी आणि शांततेचा शोध घेणाऱ्यांसाठीही एक आदर्श ठिकाण मानले जाते.
रामदरा मंदिर मुख्यतः भगवान शंकरांना समर्पित आहे. मात्र येथे राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींसह दत्तगुरूंचेही दर्शन घेता येते. त्यामुळे विविध श्रद्धा असलेल्या भाविकांसाठी हे ठिकाण विशेष महत्त्वाचे ठरते. मंदिराच्या मागील बाजूस असलेला तलाव आणि त्यावर पडणारी सूर्यकिरणे हे दृश्य अत्यंत मनोहारी दिसते. सकाळी आणि संध्याकाळी येथे येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची संख्या मोठी असते.
रामदरा मंदिराची उभारणी 1970 साली करण्यात आली. तेव्हापासून हे ठिकाण हळूहळू भाविकांमध्ये प्रसिद्ध होत गेले. एक दिवसीय सहलीसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम असून दररोज हजारो भाविक आणि पर्यटक येथे भेट देतात. निसर्ग, शांतता आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल, तर पुण्याजवळील रामदरा मंदिराला एकदा तरी भेट द्यायलाच हवी, असेच सध्या अनेकजण म्हणताना दिसत आहेत.





