तस्करने घेतली बड्या सेलिब्रिटींची नावे
मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या एका ड्रग्ज तस्कराने चौकशीदरम्यान अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे केले आहेत. या खुलाशांमुळेच आता सेलिब्रिटींच्या अडचणी वाढल्या आहेत. मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख नावाच्या ड्रग्ज तस्कराने पोलिसांना सांगितले आहे की, तो अनेक सेलिब्रिटींसाठी आलिशान पार्ट्या आयोजित करत असे. या पार्ट्यांमध्ये अभिनेत्री नोरा फतेही, श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धांत कपूर, ओरी, चित्रपट निर्माते अब्बास-मस्तान आणि रॅपर लोका यांचा सहभाग असायचा, असा धक्कादायक दावा तस्कराने केला आहे.
advertisement
केवळ बॉलिवूडच नव्हे, तर तस्कराने बाबा सिद्दीकी यांचा मुलगा एनसीपी नेते झीशान सिद्दीकी आणि दाऊदची मृत बहीण हसीना पारकर यांच्या मुलाचेही या पार्ट्यांमध्ये नाव घेतले आहे.
दाऊद गँगशी जोडले कनेक्शन
मुंबई पोलिसांनी ज्या ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे, त्याचे कनेक्शन थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगशी जोडलेले असल्याचे सांगितले जात आहे. हा तस्कर फरार असलेला ड्रग्ज किंगपिन सलीम डोला याचा जवळचा साथीदार असल्याचे बोलले जाते. सलीम डोला हा दाऊद गँगचा प्रमुख सदस्य आहे. हे संपूर्ण प्रकरण मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आलेल्या २५२ कोटी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीशी संबंधित आहे.
सिद्धांत आणि ओरीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
पोलिसांनी आता सिद्धांत कपूरला २५ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी समन्स चुकवलेल्या ओरीला आता २६ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ओरीने मुंबईबाहेर असल्याचे कारण देत अधिक वेळ मागितला होता. अशातच या मोठ्या प्रकरणात बॉलिवूडमधील आणखी किती नावे समोर येतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
