आयएएनएसने दिलेल्या बातमीनुसार, मोहम्मद शरीफुल इस्लाम सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे. आपल्या वकिलांमार्फत त्याने जामिनासाठी अर्ज केला असून, या गुन्ह्याशी आपला कोणताही संबंध जोडणारा ठोस पुरावा नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. वकील विपुल दुशिंग यांच्यामार्फत सादर केलेल्या जामिनाच्या याचिकेत इस्लामने आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा केला आहे. त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं त्याने ठामपणे सांगितलं आहे. आपली कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचंही त्याने या याचिकेत नमूद केलं आहे. "सध्याचा एफआयआर हा तक्रारदाराची केवळ एक काल्पनिक कथा आहे," असं त्याच्या निवेदनात स्पष्टपणे म्हटलं आहे.
advertisement
याचिकेनुसार, या प्रकरणातील बहुतेक तपास पूर्ण झाला आहे आणि आता फक्त आरोपपत्र दाखल करणं बाकी आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डेटा रेकॉर्ड यांसारखे महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी आधीच गोळा केले असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. इस्लामच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे की, सर्व संबंधित पुरावे सुरक्षित असल्यामुळे, जर त्याला जामीन मिळाला, तर साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा किंवा पुराव्यांशी छेडछाड करण्याचा कोणताही धोका नाही.
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या रात्री नेमकं काय झालं होतं?
जानेवारी महिन्याच्या १६ तारखेला मध्यरात्री २:१५ च्या सुमारास सैफ अली खानवर धक्कादायक हल्ला झाला होता. सैफ आणि करीना कपूर खान यांच्या वांद्रे येथील घरी एका घुसखोराने जबरदस्तीने प्रवेश केला होता. हा घुसखोर त्यांचा धाकटा मुलगा जेहच्या खोलीत घरकाम करणाऱ्या व्यक्तीसोबत त्याची झटापट झाली. त्यावेळी, आवाज ऐकून सैफ तातडीने तिथे पोहोचला. आपल्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याने हल्लेखोराचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सैफवर धारदार वस्तूने सहा ठिकाणी वार करण्यात आले होते, त्यापैकी दोन वार त्याच्या पाठीच्या कण्याजवळ झाले होते.
दरम्यान, या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. तोपर्यंत मोहम्मद शरीफुल इस्लामला तुरुंगातच राहावं लागणार आहे. सध्या सैफ अली खान आपल्या कामात व्यस्त असून, तो शेवटचा 'ज्वेल थीफ' या चित्रपटात दिसला होता. या प्रकरणाच्या सुनावणीकडे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
