सिनेमा पाहून अस्वस्थ झाले शरद पोंक्षे
शरद पोंक्षे यांनी 'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत बाजीराव पेशवे यांच्यावरील चित्रपटाबाबत आपले परखड मत मांडले. पोंक्षे म्हणाले, "मी 'बाजीराव मस्तानी' सिनेमा बघून खूप अस्वस्थ झालो. हे काय आहे! बाजीराव यांच्या आयुष्यात काही महिने आलेली बायको एका पारड्यात आणि ४१ लढाया न हरलेला, अजेय योद्धा एका पारड्यात!"
advertisement
ते पुढे म्हणाले, "तुम्ही सिनेमा करताना तो त्यांच्या ४१ लढायांवर दाखवायला हवा होता ना? पण तुम्ही सिनेमा फक्त त्यांच्यासोबत १६-१७ महिने राहिलेल्या बायकोबद्दल आणि त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल दाखवता. सिनेमात मस्तानी दाखवा, पण तीन तासांच्या सिनेमात फक्त १५ मिनिटे दाखवा, कारण त्यांच्या आयुष्यात तिचा वाटा तेवढाच होता."
ब्राह्मणद्वेषातून बाजीराव पेशवेच गायब झाले - पोंक्षे
बाजीराव पेशवे यांच्या कार्याकडे दुर्लक्ष होण्यामागे त्यांनी थेट 'ब्राह्मणद्वेष' हे कारण असल्याचे सांगितले. पोंक्षे म्हणाले, "केवळ ब्राह्मणद्वेषातून पेशवे नालायक होते, असं दाखवून बाजीराव पेशवेच गायबच झाले. हा इतिहास लोकांना समजायला नको का?"
पोंक्षे यांनी पेशव्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीचा उल्लेख करत म्हटले, "बाजीराव पेशव्यांची कारकीर्द २० वर्षांची आहे. १९ व्या वर्षी ते पेशवे झाले आणि ४१ व्या वर्षी गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या मार्गावर आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत ते पुढे चालले होते." पोंक्षे यांनी सांगितल्यानुसार, बाजीराव पेशव्यांनी अठरापगड जातीचे लोक एकत्र करून स्वराज्याचे साम्राज्य करण्याचा प्रयत्न केला आणि तीन-चतुर्थांश हिंदुस्तानावर भगवा ध्वज फडकावला. पण लोकांना ही माहितीच नाही.
