मी झोपलेला असताना घरात आग लागली अन्...
आग लागली तेव्हा शिव ठाकरे घरातच होता, पण त्याला याची कल्पना नव्हती. त्याच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीमुळे त्याचे प्राण वाचले. शिवने सांगितले, "जेव्हा घरी आग लागली, मी घरीच होतो आणि तेव्हा मी झोपलेला होतो. आग लागली तरी घरात कोणताही अलार्म किंवा सायरन वाजला नाही. माझी मोलकरीण देवदूत बनून आली आणि तिने दार ठोठावले. मी बाहेर येऊन पाहिले तर संपूर्ण घर राख झालेले होते."
advertisement
हा भयानक प्रसंग सांगितल्यावर शिवने देवाचे आभार मानले. तो म्हणाला, "असे समजा की, वरच्या देवाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, म्हणूनच मी इथे उभा आहे." या आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे. एका शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवच्या १२ व्या मजल्यावर असलेल्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुदैवाने ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी तो हॉलमध्ये नसून बेडरूममध्ये होता.
शिव ज्या इमारतीत राहत होता, तिथे काही दिवसांपासून विजेच्या समस्या होत्या. आग लागल्यावर स्प्रिंकलर्स किंवा अलार्म सिस्टीम काहीही काम करत नव्हते, हे खूप चिंताजनक आहे. शिवने कबूल केले की, घराचे मोठे नुकसान झाले आहे, पण तो म्हणाला की पैशांची चिंता नाही, कारण ते मी पुन्हा कमवू शकतो. पण, त्याच्या ट्रॉफीज जळाल्याने त्याचे हृदय तुटले आहे. त्याने अनेक स्पर्धांमध्ये मिळवलेल्या या अमूल्य आठवणी कोणत्याही पैशाने परत मिळू शकत नाहीत. दरम्यान, शिव ठाकरेचा जीव वाचल्याने त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
