आईच्या आशीर्वादाने नव्या निर्मितीची नांदी
अभिनेता श्रेयस तळपदेने दसऱ्याच्या पावन दिवशी आपल्या आगामी प्रोजेक्टचं नाव सोशल मीडियावर जाहीर केलं. या चित्रपटाचं नाव आहे 'मर्दिनी'! हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, या सिनेमात श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरेची लोकप्रिय जोडी तर आहेच, पण सोबत अभिनेता अभिजीत खांडकेकर देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
advertisement
'मर्दिनी'चं दिग्दर्शन अजय मयेकर करणार असून, या चित्रपटाची निर्मिती खुद्द श्रेयस तळपदे आणि त्यांची पत्नी दीप्ती यांच्या 'अफ्लूएन्स मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमेटेड' या बॅनरखाली होणार आहे. श्रेयसने ही घोषणा करताना शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "आईच्या आशिर्वादाने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नांदी होत आहे एका नव्या निर्मितीची... असू देत लाख महिशासूर, पुरे आहे फक्त एक... 'मर्दिनी'. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हा सर्वांवर अखंड राहू द्या! भेटूया २०२६ मध्ये!"
‘रेशीमगाठ’ जोडीची मोठ्या पडद्यावर एन्ट्री
२०२१ ते २०२३ दरम्यान झी मराठीवर प्रसारित झालेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने श्रेयस, प्रार्थना आणि बालकलाकार मायरा वायकुळला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. छोट्या पडद्यावर गाजलेली ही जोडी आता मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्यामुळे चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.