मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून 'लागली पैज' या नव्या मराठी नाटकाची सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे. या नाटकात यशोमन आपडे प्रमुख भूमिका साकारत असून अभिनेत्री रुमानी खरे या नाटकातून व्यावसायिक नाट्य रंगभूमीवर पदार्पण करत आहे. 21 नोव्हेंबरला दुपारी चार वाजता दीनानाथ नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.
advertisement
प्रभात थिएटर्सने या नाटकाची निर्मिती केली आहे 'लागली पैज?' या नाटकाचे निर्माते श्रीमती ज्योती कठापूरकर व निखिल करंडे आहेत, तर ज्योती पाटील, प्रियांका बिष्ट, रूपा करोसिया आणि मनोज मोटे हे सहनिर्माते आहेत. नाटकाचे लेखन हर्षद प्रमोद कठापूरकर यांचे असून अंकुर अरुण काकतकर यांनी दिग्दर्शन केलं आहे. यशोमान आपटे आणि रुमानी खरे यांच्यासह या नाटकात अभिनेत्री सुप्रिया विनोद, शंतनू अंबाडेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बऱ्याच वर्षांनंतर संदीप खरे यांनी नाटकासाठी गाणी लिहिली असून त्यांनी लिहिलेल्या गीतांना साई-पियुष यांनी संगीत दिले आहे तर संतोष शिदम हे सूत्रधार आहेत.
"लागली पैज? " आजच्या तरुणाईच्या नात्याची गोष्ट आहे. नात्यामध्ये प्रेम आणि महत्वाकांक्षा ह्यांमध्ये जेव्हा निवड करण्याची वेळ येते तेव्हा निर्माण होणारी भावनिक गुंतागुंत यावर या नाटकाचे कथानक बेतले आहे. आदित्य आणि रेवा अशी यशोमन आणि रूमानीच्या भुमिकांची नावं आहे. दोघांना सतत पैज लावण्याची सवय असते. अशावेळी दोघंजण नातं टिकवून ठेवण्याची पैज लावतात, मग त्यांच्या नात्याचं काय होतं या प्रश्नाचं उत्तर नाटक पाहिल्यावरच मिळणार आहे.
